अकोला : मार्च अखेरीस पश्चिम विदर्भातील शेकडो गावात तीव्र झाल्या असून, धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४३ अंशापर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होेत असून, अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात केवळ २२.३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, अकोला शहरालगतच्या गावात नळयोजना बंद पडल्याने प्रचंड पाणी टंचाई आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी पश्चिम विदर्भातील मध्यम व मोठ्या धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मार्च महिन्यात बुलडाणा, अकोला जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. एप्रिल महिन्यात टंचाईची तीव्रता वाढल्याने पश्चिम विदर्भातील जिल्हा प्रशासनाकडे टॅँकरची मागणी वाढली आहे.दरम्यान, उन्हाचा कडका ४२ ते ४४ अंशावर गेल्याने बाष्पीभवनाचा वेग दररोज १४ ते १५ मि.मी.ने वाढला आहे. धरणातील साठे वेगाने घटत असून, अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात मार्च महिन्याच्या शेवटी २२.३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा धरणात १६.६९ दलघमी साठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ६.८५ दलघमीच पाणी उपलब्ध आहे. दगडपारवा धरणात तर शून्य टक्क्यावर आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ४३.१७ टक्के पाणी उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा जवळपास १०.१६ टक्के, पेनटाकळी १.२२, खडकपूर्णा शून्य टक्के, ज्ञानगंगा ११.५ टक्के, मस शून्य टक्के, कोराडी शून्य टक्के, पलढग १४.५१ टक्के, तोरणा ३.३० टक्के, उतावळी २५.२१ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात ३.२५ टक्के, अडाणमध्ये १७.८४ टक्के तर एकबुर्जी धरणात २२.७२ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसची टक्केवारी जवळपास ३५.१० टक्के असून, सायखेडा २६.४१ टक्के, गोकी २९.९९ टक्के, वाघाडी ३०.२३ टक्के, बोरगाव १४.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणात केवळ २०.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शहानूर ४४.२४, चंद्रभागा ४७.१८, पूर्णा ३२.९१, सपन ५६.३७ टक्के साठा आहे.