लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्त्रोताचे स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींना पिवळे तर ७८३ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींना महिनाभरात याबाबत उपाययोजना कराव्या लागणार आहेत.जिल्ह्यात ६ हजार ८४१ पाणीस्त्रोत आहेत. नळयोजना, विहिर, हातपंपांचा यामध्ये समावेश आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा स्त्रोतांचे वर्षातून दोन वेळा सर्व्हेक्षण करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर हे सर्व्हेक्षण करण्यात येते. जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा स्त्रोतांचे आॅक्टोंबरपर्यंत स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये ८५ ग्रामपंचायतींना पिवळे तर ७८३ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आाले. पाणीपुरवठा स्त्रोतातील पाणी नमुन्यांची कारणे शोधून संबंधित ग्रामपंचायतींना महिनाभरात उपाययोजना करणे अनिवार्य आहे.पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याकडे सार्वजनिक पाणीपुरवठा नळयोजना, विहिर, बोअरवेल, हातपंप हे स्त्रोत आहेत. सर्वच स्त्रोत पिण्यास योग्य असतीलच असे नाही. बºयाचदा अनेक पाणी स्त्रोतात काही घटकांची कमतरता आढळून येते. तर काही घटक जास्त प्रमाणात असतात. शरिरावर याचा परिणाम होवू शकतो. आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी नमुन्यांचे सर्व्हेक्षण करुन तपासणी करण्यात येते. प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करण्यात येते. तपासणीत हे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही कळते. पाण्यात काही घटकांची कमतरता असल्यास किंवा काही घटकांचे प्रमाण वाढल्यास त्याबाबत उपाययोजना करण्यात येतात.पावसाळा तोंडावर आला असून पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. पाण्यातून अनेक आजारांचा प्रसार होतो. वेळीच आजारांना आवर घालण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहेत. पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांबाबत प्रशासनाकडून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येतात. मात्र अनेकदा बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पाणी नमुन्याची तपासणी करण्याकडे लक्ष दिल्या जात नाही. त्यामधून आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. नागरिकांनी याबाबत दक्षता घेतली पाहिजे. आरोग्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. शरिरात जवळपास ७० टक्के पाणी असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.असे दिले जाते कार्डपाणी स्त्रोताच्या स्वच्छता सर्व्हेक्षणानंतर जोखीम तपासणी केली जाते. सौम्य जोखमीसाठी हिरवे, मध्यमसाठी पिवळे व तीव्र जोखीमसाठी संबंधित ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जातात. शुन्य ते २९ गुणांपर्यंत हिरवे कार्ड, ३० ते ६९ गुणांपर्यंत पिवळे व ७० पेक्षा जास्त गुणांवर लाल कार्ड मिळते. जिल्ह्यात एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळालेले नाही. हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतीचे पाणीस्त्रोत पिण्यास योग्य असून पिवळे कार्ड मिळालेल्या स्त्रोतांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहेत.यांच्या स्वाक्षरीने होते कार्डचे वाटपसौम्य जोखीमचे हिरवे कार्ड वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सहीने देण्यात येते. तर पिवळे कार्ड गटविकास अधिकारी, ग्रामिण पाणीपुरवठा विभागाचे तालुका उपअभियंता व तालुका आरोग्य अधिकाºयांच्या स्वाक्षरीने दिले जाते. लाल कार्ड हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाणीस्त्रोत स्वच्छता सर्व्हेक्षण : ८५ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 3:57 PM