अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा आजमितीस ४६.८९ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील दोन धरणे कोरडी असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचल्याने यावर्षीचे पाणी संकट टळले आहे.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणात ४६.८९ जलसाठा सध्या उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन धरणांमधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ४९.७२ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ६२.९८ टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा ६८.९२, मोर्णा धरणात ३१.९६ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ६५.५३ टक्के जलसाठा संकलित झाला. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोरणा ११.११, तर उतावळी धरणातील पातळी २९.३१ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १४.२२ टक्के, पेनटाकळी धरणात ७.१० टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १६.६५ टक्के, पलढगमध्ये १७.७१ टक्के, मन धरणात १८.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ७६.९१ टक्के, एकबुर्जी धरणात १०० टक्के, तर सोनल धरणात ६६.४९ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४६.२४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ७८.८१, तर बेंबळा धरणात ५२.७२ टक्केच जलसाठा आहे.