अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) आठ प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, इतर चार प्रकल्पातील साठाही १ ते ८ टक्केच आहे. पाणीच उपलब्ध नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. फळ झाडे, पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू मिळून ५०२ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत २ मे रोजी केवळ १५.५१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पाच जिल्ह्यात ९ मोठे प्रकल्प असून, २४ मध्यम तर ४६९ लघू प्रकल्प आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती विदारक आहे. या जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के असून, नळगंगा प्रकल्पात केवळ ८.८३ टक्केच साठा शिल्लक आहे. मस व कोराडी मध्यम प्रकल्प शून्य टक्के, तोरणा प्रकल्पात ०.२५ टक्के, ज्ञानगंगा ८.३४, पलढग ११.१९, मन १६.४८ तर उतावळी प्रकल्पात २१.३२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या प्रकल्पातील जलसाठा १५.५८ टक्के आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने या साठ्यात वेगाने घट होत आहे. निर्गुणा मध्यम प्रकल्प व घुंगशी बॅरेजमध्ये शून्य टक्के साठा असून, उमा ४.२०, मोर्णा प्रकल्पात ११.६३ तर वान प्रकल्पात ३६.३९ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात शून्य टक्के, अडाण १४.०१ तर एकबुर्जी प्रकल्पात १४.७० टक्केच साठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा मोठ्या प्रकल्पात यावर्षी आजमितीस १७.८१ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस मोठ्या प्रकल्पात २७.५०, अरुणावती १४.२२ तर बेंबळा प्रकल्पात २२.७३ टक्के जलसाठा आहे.