- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीच्या योजनेचे काम गत एप्रिलमध्येच पूर्ण करण्यात आले; मात्र उन्हाळा उलटून गेला असला, तरी अद्यापही पाणीटंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना ‘वान’चे पाणी मिळाले नाही. त्यामुळे वान धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना बिनकामाची ठरली असून, पावसाळ्यातही टंचाईग्रस्त ४४ गावांची तहान ‘टँकर’च्या पाण्यावरच भागविली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला असून, गत सप्टेंबरपासून खांबोरा पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना धरणातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त गावांना गत आॅक्टोबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत टंचाईग्रस्त ४४ गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी ६७ लाख रुपयांच्या तातडीच्या योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत उगवा फाटा ते घुसरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकून घुसर येथील ‘सम्प’मधून ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चोहोट्टा बाजार येथे ६० अश्वशक्तीचे सबमर्सिबल पंप बसविण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत योजनेचे काम गत एप्रिलमध्ये पूर्ण करण्यात आले असून, त्यानंतर टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी चाचणी घेण्यात आली असता, चोहोट्टा बाजार ते उगवापर्यंत जुनी जलवाहिनी ठिकठिकाणी ‘लिकेज’ होत असल्याने ‘वान’चे पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांपर्यंत पोहोचले नाही. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामात उन्हाळा उलटून गेला, पावसाळा सुरू झाला; मात्र वान धरणाचे पाणी खारपाणपट्ट्यातील ग्रामस्थांना मिळाले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त ४४ गावांतील ग्रामस्थांना अद्यापही टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. वान धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीची बाब म्हणून कोट्यवधी रुपयांच्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले; मात्र ग्रामस्थांना पाणी मिळाले नसल्याने आणि गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलेली ही पाणी पुरवठा योजना बिनकामाची ठरली आहे.कोट्यवधींचा खर्च पाण्यात?वान धरणातून टंचाईग्रस्त ४४ गावांना पाणी पुरवठा करण्याच्या योजनेच्या कामावर ३ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला; मात्र योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर अद्याप या योजनेंतर्गत ‘वान’चे पाणी गावांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे या योजनेच्या कामावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात तर गेला नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दहा महिन्यांपासून ‘टँकर’द्वारे सुरू आहे पाणी पुरवठा!खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ५५ गावांमध्ये गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. गत महिन्यांपासून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळा संपला असला, तरी ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.
वान धरणातून ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेचे काम पूर्ण करण्यात आले; मात्र उन्हाळा संपला तरी ग्रामस्थांना ‘वान’चे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावरच ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. टंचाईच्या परिस्थितीत पाणी मिळाले नसल्याने वान धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचा टंचाईग्रस्त गावांना उपयोग झाला नाही.- दिलीप मोहोड, अध्यक्ष, बारुला कृती समिती, आपातापा.