सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात दमदार पावसाचा अद्याप पत्ता नाही. पिके हातची जात आहेत. त्याचवेळी येत्या दहा महिन्यांतील पिण्याच्या पाण्याची समस्या कशी सोडवणार, या विवंचनेत आता शासन, प्रशासन आहे. वान धरणातील साठा, त्यातून होणारा पुरवठा, तसेच १५ लघू प्रकल्प अद्यापही कोरडे असल्याने येत्या काळातील पाणीटंचाईला कसे तोंड देणार, या विचाराने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सकाळी प्रशासनाची बैठक बोलावली आहे. खारपाणपट्टय़ातील ५५ गावांसाठी जीवनवाहिनीअसलेली ६४ खेडी पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी नदीपात्रातून पुरवठा करण्याचा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांनी बाजूला ठेवला आहे. पुरवठा होणार्या पाण्यापेक्षा नासाडी प्रचंड असल्याचे कारण त्यामागे आहे. त्याचवेळी या गावांना पाणीपुरवठा कोठून करावा, ही समस्या कायम आहे. त्यावर उपाययोजना म्हणून टँकरने पाणीपुरवठय़ाचा प्रस्तावही आहे. मात्र, टँकरने पुरवठय़ासाठी पाण्याचा स्रोत कोणता वापरावा, ही समस्या त्यापेक्षाही मोठी आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ासाठी कुठेही हायड्रंटसची सोय नाही.
१५ लघुप्रकल्पातील साठा शून्यावरजिल्ह्यातील २७ पैकी १२ लघुप्रकल्पात नाममात्र पाणीसाठा आहे, तर १५ प्रकल्पात तो शून्य आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील बोरगाव, सिसा उदेगाव, कुंभारी, सुकळी, अकोट तालुक्यातील शहापूर बृहत, चिचपाणी, भिलखेड, धारूर, मूर्तिजापूर तालुक्यातील पिंपळशेंडा, बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, जनुना, घोटा, झोडगा, मोर्हळ, हातोला, पातूर तालुक्यातील सावरगाव बाजार, गावंडगाव, विश्वमित्री, बाळापूर तालुक्यातील कसुरा कोल्हापुरी बंधारा, तामशी कोल्हापुरी बंधार्याचा समावेश आहे. काही नाममात्र साठा असलेले प्रकल्प मूर्तिजापूर तालुक्यातील शिवण खुर्द, पातूर तालुक्यातील हिवरा, झरंडी संग्राहक, तुळजापूर, बाश्रीटाकळी तालुक्यातील घोंगा, पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे, सावरखेड, इसापूर, मोझरी, कानडी प्रकल्प आहेत.
‘६४ खेडी’ बंद पडल्याने टँकरग्रस्त गावे६४ खेडी योजना बंद पडल्याने ५५ गावांना टँकरने पुरवठय़ाचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील सांगवी खुर्द, गोपालखेड, वल्लभनगर, गांधीग्राम, सांगवी बुद्रूक, हिंगणा तामसवाडी, फरार्मदाबाद, निंभोरा, नवथळ, खेकडी, परितवाडा, पाळोदी, निराट, वैराट, गोत्रा, धामणा, राजापूर, बादलापूर, कंचनपूर, आगर, कासली बुद्रूक, कासली खुर्द, म्हातोडी, घुसर, अलिमाबाद, अनकवाडी, दापुरा, मारोडी, एकलारा, खोबरखेड, आपातापा, आखतवाडा, शामाबाद, सुल्तान आजमपूर, आपोती बुद्रूक, आपोती खुर्द, अंबिकापूर, मजलापूर, जलालाबाद, गोणापूर, रामगाव, गोंदापूर, दहिगाव, पळसो खुर्द, धोतर्डी, सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, सांगळूद बुद्रूक, कौलखेड गोमासे, कौलखेड, लाखोंडा बुद्रूक, लाखोंडा खुर्द या गावांचा समावेश आहे. दरडोई २0 लीटरप्रमाणे पाणीपुरवठय़ाची सोय टँकरद्वारे करावी लागणार आहे.
‘वान’च्या पाण्यासाठी वाटेकरी वाढले!गेल्यावर्षी योजनेतील ५५ गावांना वान प्रकल्पाच्या देवरी फाटा आणि चोहोट्टा येथील व्हॉल्ववरून टँकरमध्ये पाणी घेण्यात आले. यावर्षी वानचे पाणी मिळते की नाही, ही समस्या आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातील साठा पाहता या गावांना पाणी मिळणे अशक्य आहे. त्या प्रकल्पावर अकोट शहर अधिक ८४ खेडी योजना, तेल्हारा शहर, शेगाव शहर अधिक संस्थान, जळगाव जामोद शहर, संग्रामपूर अधिक १४४ खेडी योजनेतील गावे अवलंबून आहेत.
४३ टक्के साठय़ावर दहा महिन्यांचे नियोजनसद्यस्थितीत प्रकल्पात उपयुक्त ४३ टक्के जलसाठा आहे. यापुढे पाऊस न आल्यास या साठय़ातून दहा महिने पुरवठय़ाचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे ५५ गावांना दैनंदिन २६ टँकर्सद्वारे लागणारे पाणी प्रकल्पातून आतापासून दिल्यास भविष्यातील समस्येचे काय, यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
मोठे व मध्यम प्रकल्पांनी गाठला तळमोठे प्रकल्प असलेल्या वानमध्ये ४३, तर काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १५.३४ टक्के साठा आहे. मध्यम प्रकल्प मोर्णामध्ये ६.९२, निगरुणा-४.६१, उमा-0.१0 टक्के पाणीसाठा आहे. या तीन प्रकल्पाच्या क्षेत्रात आतापर्यंत अनुक्रमे ३२२, २६२, २५0 मिमी पावसाची नोंद आहे.