संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या जलसंकटाच्या परिस्थितीत सुकळी येथील तलावात बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांना खांबोराजवळील उन्नई बंधार्यातून आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; मात्र उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात ६४ गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने अकोला तालुक्यातल्या सुकळी येथील तलावात प्रायोगिक तत्त्वावर बोअर करून, त्याद्वारे ६४ गावांना पाणीपुरवठा करण्याचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर या प्रस्तावाला जिल्हाधिकार्यांकडून केव्हा मान्यता मिळणार आणि टंचाईग्रस्त गावांना प्रत्यक्षात पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दूषित पाण्यावर भागविली जाते तहान; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात! खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने, ६४ गावांमधील ग्रामस्थांना नदी-नाल्यातील ‘झिर्या’च्या दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. तहान भागविण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने, या गावांमधील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महिनाभरापासून ग्रामस्थांना मिळाले नाही पाणी!उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने गत महिनाभरापासून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६0 गावांमधील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.
सुकळी येथील तलावात प्रायोगिक तत्त्वावर बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.-उल्हास बंडसहायक भूवैज्ञानिक, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग