अकोट उपविभागातील ग्रामिण ८६ खेडे पाणी पुरवठ्या अंतर्गत या खेड्यांना सहा ते सात दिवसांवर पाणी पुरवठा होत आहे. सहा सात दिवसांसाठी पाणी साठवण व्यवस्था नसल्याने मग दुसऱ्या दिवसापासून नागरिकांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकंती करण्याची पाळी आली आहे. शिवाय हा बहुतांश भाग खारपाणपट्ट्याचा असल्याने क्षारयुक्त पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक आहे. विशेष म्हणजे दिवसभर नळाला पाणी येत असल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. गुरे जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
वास्तविक वान धरणात मुबलक साठा असताना, अनियमित पाणी पुरवठा का करण्यात येत आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. किमान दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे. एप्रिल, मे महिन्यातही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळू नये ही शोकांतिका आहे.