आगर परिसरातील नवथळ, खेकडी, पाळोदी, कंचनपूर, बादलापूर आदी गावांना दर आठवड्यातून एकदा खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या महिन्याभरापासून पाणीपुरवठा योजनेच बंद असल्याने ग्रामस्थांची भटकंती होत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली; मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने नेते यामध्ये व्यस्त आहेत. दुसरीकडे, नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.
पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड
गावात पाणीपुरवठा ठप्प असल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. तसेच ग्रामस्थांना दररोज खासगी टँकरमधून पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
फोटो : आगर गावातील रिकामे जलकुंभ.