खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या उगवा, आगर, नवथळ, परितवाडा, पाळोदी, कंचनपूर आदी गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. परंतु खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून येथे होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
गेल्या एक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ग्रामस्थांच्या हाताला काम नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता कसेबसे आपले जीवन जगत आहे. त्यातच अचानक झालेली ही पाणीटंचाई ग्रामस्थांच्या जीवावर उठली आहे. खारपाणपट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये कुठेच गोड पाण्याचे स्रोत नसून, गावाशेजारी सुद्धा कुठेच पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. २५ वर्षांपासून या गावाला पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. दर पंचवार्षिक योजनेत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधींना गावातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येते. परंतु आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नाही.
या पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीत बाळापूर मतदार संघातील आमदार नितीन देशमुख यांनी, आगर गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. गावाच्या पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाणीटंचाईची चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून, गावातील पाणी समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
फोटो: मेल
पाणीटंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आगर परिसरात गेल्या २० दिवसांपासून असलेल्या पाणीटंचाईबाबत नवथळ येथील माजी सरपंच तसेच समाजसेवक राजेंद्र तेलगोटे यांनी १९ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे
वीज वसुली सक्तीमुळे नागरिक त्रस्त
गेल्या एक वर्षापासून कोरोनासंकट कायम असून मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे वीज बिल भरावे कसे हा प्रश्न ग्रामीण जनतेसमोर आहे. आता पाणी कर वसुलीची सुद्धा धडक मोहीम सुरू झाल्यामुळे वीजबिल व पाणी बिल भरावे कसे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेने ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.