मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांतील जलवाहिन्यांना अचानक गळती लागण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याचे समाेर आले आहे. जलवाहिन्यांना गळती लागणे, व्हाॅल्व्ह नादुरुस्त हाेत असल्याच्या सबबीखाली जलप्रदाय विभागाकडून संबंधित भागातील पाणीपुरवठा बंद केला जात आहे. जलवाहिनी किंवा व्हाॅल्व्ह दुरुस्तीसाठी जलप्रदाय विभागातील काही बाेटावर माेजता येणारे कंत्राटदार पुढे येत असले तरी काही कंत्राटदार कागदाेपत्री दुरुस्तीची कामे पूर्ण करून त्याबदल्यात लाखाे रुपयांची देयके लाटत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अचानक जलवाहिन्यांना गळती लागणे व त्यांच्या दुरुस्तीसाठी हाेणाऱ्या खर्चाबाबत शंकाकुशंका निर्माण झाल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी महान जलशुद्धीकरण केंद्रातील ६५ एमएलडी प्लांवरील मुख्य जलवाहिनीवरील व्हाॅल्व्ह नादुरुस्त झाला हाेता. त्याच्या दुरुस्तीला दाेन दिवसांचा अवधी लागला हाेता. त्यानंतर आता ‘अमृत’ याेजनेंतर्गत महाजनी जलकुंभावरील मुख्य जलवाहिनीवर जाेडणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या जलकुंभावरून हाेणाऱ्या भागातील पाणीपुरवठा ५ जानेवारीपर्यंत बंद केल्या जाणार आहे.
काेट्यवधींच्या देयकांवर ताव
जलप्रदाय विभागात नियुक्त कंत्राटदार नगरसेवकांचे नातेवाइक तसेच कार्यकर्ते आहेत. कुटुंबाचा व कार्यकर्त्यांचा चरितार्थ चालावा या उद्देशातून मनपातील सर्वपक्षीय पदाधिकारी अर्थसंकल्पात दरवर्षी जलवाहिनी, व्हाॅल्व्ह, सबमर्सिबल, हातपंप दुरुस्तीसाठी काेट्यवधींची तरतूद करतात. ही तरतूद पाच काेटींपेक्षा अधिक असल्याने हा खर्च करण्यासाठी अनेकदा जाणीवपूर्वक जलवाहिन्या, हातपंप, सबमर्सिबल पंपाची कामे केली जातात.
एक टक्का देताच फाइल मंजूर !
कंत्राटदारांच्या फायलींमध्ये त्रुटी न काढता देयकांचा मार्ग माेकळा करण्यासाठी या विभागातील पुरुष तसेच काही महिला कर्मचारी उघडपणे अर्धा टक्का कमिशनची मागणी करतात. कागदाेपत्री काम असेल तर एक टक्का कमिशनची मागणी केली जाते. त्यामुळेच या विभागातून बदली टाळण्यासाठी भ्रष्ट प्रवृत्तीच्या महिला कर्मचारी काही राजकीय पदाधिकारी व कंत्राटदारांच्या माध्यमातून अनेकांची मनधरणी करीत असल्याची माहिती आहे.