अकोला: सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय निवासस्थानांमधील नळाला आठ दिवसांच्या आत मीटर लावण्यासोबतच थकीत पाणीपट्टीचा तातडीने भरणा करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला होता. सोमवारी मनपाच्या जलप्रदाय विभागाने ‘पीडब्ल्यूडी’मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थांनासह जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करत दोन्ही यंत्रणांना जोरदार झटका दिला.शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मनपा प्रशासनाच्या एकूण ३०० नळ जोडण्या आहेत. त्यामध्ये अधिकाºयांचे शासकीय निवासस्थान व शासकीय कार्यालयांमधील नळ जोडणीचा समावेश आहे. मागील दोन वर्षांपासून या विभागाकडे पाणीपट्टी थकीत असून, अद्यापपर्यंत पाणीपट्टीचा भरणा करण्यात आला नाही. यासोबतच नळ जोडणीला मीटर बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आजवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यासंदर्भात संबंधित विभागाला मनपाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. नळाला मीटर बसविण्यासोबतच पाणीपट्टीचा तातडीने भरणा करावा, अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा जलप्रदाय विभागाने दिला होता. सोमवारी जलप्रदाय विभागाच्या अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम पथकाने चौधरी विद्यालयाजवळील जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाºयांचे निवासस्थान तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाºया विशाल चैतन्य, सागर व तारा नामक इमारतींमधील सुमारे १२७ नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई केली....तर कारवाई टाळता येईल!शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी थकीत आहे. संबंधितांनी थकीत रकमेचा तातडीने भरणा केल्यास भविष्यातील अप्रिय कारवाई टाळता येणार असल्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.