पातूर : एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे शेतशिवारातील पाणवठे, तलाव आटल्यामुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, तसेच उन्हात पक्ष्यांची लाहीलाही होत असून, पाण्यासाठी भटकंती होत आहे. सामाजिक दायित्व जपत पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या संकल्पनेतून पातूर पोलिसांनी स्टेशन परिसरातील झाडावर जलपात्र बांधले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पक्ष्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकत होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याने अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे, तसेच शेतशिवारातील पाणवठे, तलाव आटल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी गाववस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. पक्ष्यांची तृष्णातृप्ती व्हावी, यासाठी पीएसआय अमोल गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी व महिला होमगार्ड यांनी पोलीस स्टेशन परिसरातील झाडांवर जलपात्र बांधले आहेत. यावेळी होमगार्ड समादेशक संगीता इंगळे, माधुरी उमाळे, सुनीता सदार, रवीना अंभोरे, प्रतिभा खोकले, महिला पोलीस मीना चांदेकर, सीता पोले, अस्मिता सदार, मीना घुगे आदी महिला कर्मचारी उपस्थित होत्या. (फोटो)