अकोला : जिल्हा परिषदेतील कोल्हापुरी बंधाऱ्यांचा प्रचंड घोळ अद्यापही कायम असताना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभागाकडून सुरू असलेले सिमेंट काँक्रिट नाला बांधही बंधाऱ्यांच्या बुडीत क्षेत्रात निर्माण केले जात आहेत. या प्रकाराची तक्रार केल्यानंतर चौकशी अधिकारी म्हणून बंधाऱ्यांची स्थळ निश्चितीसाठी जबाबदार अधिकाऱ्यालाच नेमण्यात आले. त्यातून कृषी विभागाकडून अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. पातूर तालुक्यातील भानोस येथे सिमेंट काँक्रिट नाला बांधाची कामे करण्यात आली आहेत. पातूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने ही कामे केली आहेत. विशेष म्हणजे, त्या गावात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने आधीच भानोस-२ या कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती केली आहे. अंदाजपत्रकात त्या बंधाऱ्याच्या साठ्याची लांबी ९०० मीटर दाखवण्यात आली आहे. ज्या नाल्यावर आणि जागेवर हा बंधारा आहे, त्याच बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाच साखळी सिमेंट काँक्रिट नाला बांधाची कामे सुरू आहेत. त्यातील जवळपास सर्वच बांध कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रात आहेत. एक सिमेंट नाला बांध बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस केवळ १५० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या साठ्याच्या बुडीत क्षेत्रात बांध बुडण्याचे तारतम्यही कृषी विभागाने ठेवले नाही, हे विशेष. त्यातून केवळ निधी अडवा, निधी जिरवा, असाच कार्यक्रम राबवल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबतची तक्रार संजय सुरवाडे यांनी केल्यानंतर चौकशी अधिकारी म्हणून बांधांची स्थळ निश्चित करण्याची जबाबदारी असलेल्या अकोट येथील उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांना नेमण्यात आले आहे. स्थळ निश्चित करणाऱ्यांकडेच चौकशीसिमेंट नाला बांधाची स्थळ निश्चिती करणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजुरी देण्यास जबाबदार असलेले अकोट येथील उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांनाच याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी दिले आहेत. त्यामुळे स्वत:ची चौकशी त्यांच्याकडे कशी सोपवण्यात आली, हा मुद्दाही आता गंभीर होत आहे. पाणी साठ्यावर आधारित मापदंड नाहीतसाखळी सिमेंट काँक्रिट नाला बांधांच्या कामांना पाणी साठ्यावर आधारित मापदंड नाहीत. त्यामुळे सिमेंट नाला बांधा खोलीकरणासह करावयाचे आहेत. ज्या ठिकाणी खोलीकरण करता येत नाही, त्या ठिकाणी ही कामे करता येत नाहीत. भानोस येथे सिमेंट नाला बांधाची कामे केलेल्या ठिकाणी नाल्यात वरच खडक उघडा पडलेला आहे, तसेच कमी खोलीवर खडक आहे. त्यामुळे बांधलेले सिमेंट नाला बांध खोलीकरणाशिवायच केलेले आहेत. त्याशिवाय एम-१५ ग्रेडच्या काँक्रिटमध्ये काम न करता ते एम-१० मध्ये करण्यास उपविभागीय कृषी अधिकारी कंडारकर यांनी मंजुरी दिली आहे. कृषी विभागात अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे अकोटच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना चौकशी सोपवली आहे. त्यांच्याबाबतीत समाधान नसेल, तर तक्रारकर्त्याने पत्र दिल्यास चौकशी अधिकारी बदलण्यात येईल. - राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.
जलयुक्त शिवारचे बांध चुकीच्या जागेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 1:51 AM