अकोला: विदर्भात गतवर्षी पूरक पाऊस न झाल्याने त्याचे तीव्र परिणाम फळपिकांवर होत असून, अनेक ठिकाणी फळबागा वाचविण्यासाठी कृषी संस्थांसह शेतकर्यांना आटापिटा करावा लागत आहे. गत आठवड्यापासून विदर्भात काही भागात गारपीट होत असली तरी अनेक भागांमध्ये तापमान वाढल्याने शेतकर्यांना पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मुख्यत्वे पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये अपेक्षित जलसंचय झाला नाही. परिणामी पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी या भागातील प्रशासनाने ५0 टक्क्यांच्या आत जलसाठा असलेल्या धरणांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यास प्रतिंबध घातला आहे. पश्चिम विदर्भातील जवळपास सर्वच धरणांमधील जलपातळी सरासरी १५ ते २0 टक्क्य़ांपर्यंतच आहे. परिणामी अनेक ठिकाणी विहिरी, कूपनलिकांमध्ये पाणी नसल्याने शेतकर्यांपुढे फळबागा जगविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संत्र्याचे सर्वाधिक १ लाख ५0 हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे; परंतु पावसाच्या अनिश्चिततेमुळे वातावरणात आद्र्रता नाही तसेच पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. राज्यात केळीचे क्षेत्र ८२ हजार हेक्टर असून, द्राक्षे ९0 हजार, पेरू ३९ हजार, आंबा ४८२ हजार, पपई १0 हजार, लिंबूवर्गीय फळे २७७ हजार हेक्टर, डाळिंब ७८ हजार, चिकू ७३ हजार व इतर फळपिके ४१८ हजार हेक्टर क्षेत्रावर आहेत. रोजगार हमी योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत या राज्यात सर्वाधिक फळबाग लागवड झाली आहे. म्हणूनच फळपिकांबाबत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे; परंतु ५0 फूट खोलीवर लागणारे पाणी आता ३00 ते ३५0 फूट खोल जाऊनही लागत नसल्याचे या भागातील चित्र आहे.यावर्षीच्या उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. संत्र्याचे पीक गारपिटीने एकीकडे उद्ध्वस्त होत असताना, दुसरीकडे पाणी नसल्याने झाडाला लागलेली संत्री पिवळी पडत आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने टॅँकरने पाणी देऊन झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
टॅँकरने पाणी देऊन फळबागा जगविण्याचा आटापिटा!
By admin | Published: March 08, 2016 2:19 AM