अकोटः येथील गुलमोहर शिक्षक कॉलनीत पावसाचे साचल्याने परिसरात तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी करीत नागरिकांनी नगरपालिकेला निवेदन दिले आहे.
चार दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे परिसरात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. दरवर्षी कॉलनीतील नागरिकांना पावसाळ्यात विविध संकटाचा सामना करावा लागतो. अनेकवेळा नागरिकांनी नगरपालिकेस नाल्या, रस्ते, पथदिवे बाबत तक्रारी केल्या ; मात्र नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.
---------------------
विकास खोळंबला, नागरिक त्रस्त
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक कॉलनीचा विकास खोळंबला आहे. कॉलनीत नगरपालिकेने सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या बांधल्या नाहीत. काही भागात रस्ते नाहीत, विद्युत खांब आहेत, पण पथदिवे बंद आहेत. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
------------------
माझ्या घराच्या आजूबाजूला पावसाचे पाणी साचले आहे. दूषित पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, चिमुकल्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्याची विल्हेवाट लावावी.
-दिनेश रामचंद्र आग्रे, गुलमोहर शिक्षक कॉलनी, अकोट.