लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वान हनुमान सागर प्रकल्पातून तेल्हारा तालुक्यासह संग्रामपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना १ डिसेंबरपासून पाणी मिळणार आहे. तेल्हारा येथे वान अधिकारी व शेतकरी यांच्या सभेत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.यावर्षी तेल्हारा तालुक्यात पाऊस जास्त झाल्याने वान हनुमान सागर धरण काही दिवसांतच शंभर टक्के भरले आहे. सततच्या पावसाने बरेच वेळा विसर्ग करावा लागला आहे. त्यामुळे वान हनुमान प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळेल ही आशा होती. तरी अमृत योजनेमुळे पाणी मिळते की नाही, ही शंका असताना आजच्या सभेत पाणी १ डिसेंबरपासून मिळणार असल्याचे समजल्याने शेतकरी रब्बी हंगामात पिके घेण्याच्या तयारीला लागणार आहेत. यावर्षी तालुक्यातील शेतकºयांच्या हाती खरिपाचे पीक लागले नाही. सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे पीक उत्पादन नगण्य झाले. तसेच परतीच्या पावसामुळे होते नव्हती पिके हातची गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता पर्याय नसल्याने शेतकरी रब्बी तयारीत होते.वान धरणाचे पाणी मिळाले तर पुढे काहीतरी पीक पेरता येईल, ही आशा शेतकºयांना होती. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्प अधिकारी कार्यालय तेल्हारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत लाभधारक शेतकºयांनी मोठी हजेरी लावली. यामध्ये वान धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी केल्यानंतर अधिकाºयांनी याला संमती देऊन येत्या १ डिसेंबरपासून रब्बी हंगामातील गहू, भुईमूग, हरभरा आदी पिकांना पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकºयांना शासनाने हरभरा, गहू बियाणे व खत मोफत देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता सर्व पाणी वापर संस्थांच्यावतीने मागील पाणी पट्टी शासनाने माफ करावी व पुढील नियोजन नवीन सोसायट्यांनी करण्यास सहकार्य करावे.-हरिदास वाघ, शेतकरी, हिंगणी.
रब्बी हंगामासाठी १ डिसेंबरपासून सोडणार वान धरणाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:31 PM