हिरपूर, दि.२ : येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाइन लिकेज होणे व ओव्हर फ्लोमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी लाखो लिटर पाणी ओव्हर फ्लोमुळे शेतरस्त्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल आणताना अतोनात त्रास सहन करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी १४ फेब्रुवारी रोजी प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन उपअभियंता बोबडे यांनी दुरुस्तीकरिता कर्मचारी तर पाठविले; परंतु थातूरमातूर दुरुस्ती केल्यामुळे परत ‘ये रे माझ्या मागल्या’सारखी परिस्थिती निर्माण झाली. यावेळी टाकीवरून पाणी वाहत असल्यामुळे शेतरस्ता खराब झाल्यामुळे शेतमाल आणण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होत आहे. शेतकरी महादेव सोळंके यांनी कुटार आणण्याकरिता भाड्याने बैलगाडी सांगितली; परंतु चिखलामध्ये गाडी फसल्यामुळे कुटाराचे नुकसान झाले, तसेच जास्तीचे मजूर लागल्यामुळे १५०० रुपयांचे नुकसान झाले. हिरपूर गावामध्ये सर्वच पक्षाचे पदाधिकारी असूनही समस्या सुटत नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे.
पाण्याचा अपव्यय सुरूच!
By admin | Published: March 03, 2017 1:45 AM