अकोला: संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलप्रदाय विभागाने दक्ष राहण्याची गरज आहे. जलवाहिन्यांसह हातपंप, सबमर्सिबल पंपांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदारांची थकीत देयके अदा करण्यासोबतच बांधकाम विभागातील प्रलंबित कामे निकाली काढण्याचे निर्देश सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. स्थायी समितीच्या सभागृहात महापौर अग्रवाल यांनी संबंधित विभागाचा आढावा घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती विनोद मापारी व नगरसेवक उपस्थित होते.उन्हाळ््याच्या दिवसांत महान धरणातील उपलब्ध जलसाठा, शहराला होणारा पाणीपुरवठा आणि त्यामध्ये अचानकपणे उद्भवणारे संकट आदी बाबी लक्षात घेता जलप्रदाय विभागाने दक्ष राहण्याची गरज आहे. या विभागामार्फत वर्षभर जलवाहिन्या, हातपंप, सबमर्सिबल पंपांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांची सुमारे अडीच कोटींची देणी थकीत आहे. प्रशासनाची भूमिका पाहता कंत्राटदारांनी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हात आखडता घेतल्याचे चित्र समोर आले आहे. यासोबतच बांधकाम विभागामार्फत हद्दवाढीच्या क्षेत्रात विकास कामे सुरू आहेत. संबंधित कामांचा दर्जा राखण्यासोबतच वेळोवेळी निर्माण होणाºया समस्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी सोमवारी स्थायी समितीच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, जलप्रदाय विभागातील उपअभियंता नरेश बावणे, कनिष्ठ अभियंता शैलेश चोपडे यांसह बांधकाम विभागातील अभियंते उपस्थित होते.