अकोला : आकोट ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी ह्यलिकेजह्ण झाल्यामुळे योजनेचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद झाला आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत ८८ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार झाला आहे. लिकेज दुरुस्तीचे पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी या योजनेचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. तोपर्यंत ग्रामस्थांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत आकोट शहरासह आकोट, तेल्हारा आणि अकोला या तीन तालुक्यातील ८८ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेची जलवाहिनी आकोट येथील जलशुद्धी केंद्राजवळ लिकेज झाली. त्यामुळे लिकेज दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत सुरू करण्यात आले. त्यासाठी या योजनेचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. आधीच अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली आहे. त्यातच जलवाहिनी लिकेज झाल्याच्या स्थितीत तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने आकोट शहरासह या योजनेंतर्गत ८८ गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेचा पाणीपुरवठा शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी पूर्ववत होणार आहे. तोपर्यंत मात्र पिण्याच्या पाण्यासाठी योजनेंतर्गत ८८ गावांमधील ग्रामस्थांना हेलपाटे सहन करावे लागणार असल्याची स्थिती आहे.
जलवाहिनी लिकेज; ८८ गावांमध्ये जलसंकट
By admin | Published: December 04, 2014 1:34 AM