अकोला : जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या थकीत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत बुधवारी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पथके गठीत करून, पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.
ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या अर्थ समितीच्या सभेत जिल्ह्यातील प्रादेशिक ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत थकीत पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेण्यात आला. पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच थकीत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व पंचायत विभागाची पथके गठीत करून, पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.
समितीच्या मागील सभेच्या इतिवृत्ताला या सभेत मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समिती सदस्य पुष्पा इंगळे, वर्षा वझिरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
परत आलेली रक्कम ‘त्या’
लाभार्थींच्या खात्यात जमा करा!
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांतर्गत लाभार्थींना वितरित करण्यात आलेल्या अनुदानाच्या रकमेत बँक खाते क्रमांकात त्रुटी असल्याने ५७ लाभार्थींची रक्कम परत आली. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करून संबंधित लाभार्थींच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.