अकाेला: महापालिका कार्यालयात उशिरा हजर हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मागील काही दिवसांपासून आयुक्त संजय कापडणीस यांनी वेतन कपातीच्या कारवाईचा सपाटा लावला आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात हाेत असतानासुद्धा काही कामचुकार कर्मचारी बाेध घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. साेमवारीसुद्धा अशा २५ लेट लतिफ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले.
काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील काही दिवसांपासून मनपातील प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले हाेते. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मनपाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांची काेराेनाला आळा घालण्यासाठी नियुक्ती करण्यात आली हाेती. साहजिकच महापालिकेत कामकाजानिमित्त दाखल हाेणाऱ्या नागरिकांचीही कामे खाेळंबली हाेती. मागील काही दिवसांपासून प्रशासनाचे कामकाज पूर्वपदावर येत असले तरीही महापालिकेत विभाग प्रमुखांसह अनेक कर्मचारी कार्यालयात विलंबाने उपस्थित हाेत असल्याचे चित्र समाेर आले आहे. यासंदर्भात आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सर्वसामान्य नागरिकांसह नगरसेवकांनीही तक्रारी केल्या. परिणामी, आयुक्तांनी लेट लतिफ कर्मचाऱ्यांविराेधात वेतन कपातीचे हत्यार उपसले.
आयुक्त सकाळी १०.३० ला मनपात
आयुक्त संजय कापडणीस साेमवारी सकाळी १०.३० वाजता मनपात दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध कार्यालयांतील हजेरी पुस्तिकांची तपासणी केली असता, एकूण २५ कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्याचे आढळून आले. यामध्ये नागरी आरोग्य केंद्र शिवाजी नगर/हरिहरपेठ १, नागरी आरोग्य केंद्र हरिहरपेठ १, मलेरिया विभाग दक्षिण झोन १, एल.बी.टी. कार्यालय १, बांधकाम विभाग १, नगररचना विभाग २, आरोग्य (स्व.) १, निवडणूक १, लेखा (पेंशन) १, आवक जावक १, जन्म-मृत्यू विभाग १, मोटर वाहन विभाग २, बांधकाम देखभाल दुरुस्ती विभाग २, अतिक्रमण विभाग २, एन.यू.एल.एम. कार्यालय ३, उत्तर झोन कर विभाग ४ अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतनात कपात करण्यात आली.