अकोला : जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले असून, दररोज मोठ्या संख्येने लोक कोरोनाबाधित होत आहेत. अशातच कोरोना विषाणूचा प्रसार हवेतूनही होत असल्याचे समोर आल्यानंतर, या विषाणूला रोखण्यासाठी दोन मास्क वापरण्याचा उपाय समोर आला आहे. डबल मास्कमुळे ९५ टक्के संरक्षण मिळत असल्याने, नागरिकांनी एकावर एक असे दोन मास्क वापरावे, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अकोला जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उंचावत गेलेला आलेख आता उच्च पातळीला असून, या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,७०९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ७२१ जणांचा मृत्यू झाला असून, ३५,५२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ५,४५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क न घालणे, सामाजिक अंतर न राखणे यासारख्या गोष्टींमुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोना रुग्णाच्या खोकण्या व शिंकण्यातून उडणारे तुषार इतरांना बाधित करण्यासाठी पुरेसे असल्यामुळे मास्क वापरणे गरजेचे आहे. गर्दी किंवा कामाच्या ठिकाणी आता केवळ एक मास्क वापरणे पुरेसे नसून, दुहेरी मास्क वापरला पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
मास्क हीच ढाल
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. मास्क डबल असो वा एकेरी, परंतु त्याने पूर्ण तोंड व नाक झाकले गेले पाहिजे. कोरोना रुग्णाच्या खोकणे किंवा शिंकण्यातून उडणारे ड्रॉपलेट रोखण्यासाठी मास्क हाच एकमेव पर्याय आहे. सर्जिकल, चांगल्या दर्जाचा कापडी मास्क, एन ९५ मास्क या पैकी कोणताही मास्क वापरला पाहिजे.
सर्जिकलवर कापडी मास्क
गर्दीच्या ठिकाणी किंवा कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात येण्याची शक्यता असलेल्यांनी दुहेरी मास्क वापरणे हितावह ठरते. सर्जिकल मास्क व त्यावर साधा कापडी मास्क वापरला, तरी ९५ टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळते. दुहेरी मास्क वापरल्याने नाका ताेंडावाटे कोरोनाचे विषाणू शरीरात प्रवेश करण्याचा धोका टळतो.
हे करा...
एकदा वापरलेला सर्जिकल मास्क पुन्हा वापरू नये. कापडी मास्क स्वच्छ धुऊन वापरता येऊ शकतो. मास्क नाक व तोंडावर घट्ट बसलेला हवा. एका सर्जिकल मास्कवर दुसरा सर्जिकल मास्क वापरू नये. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या खोलीत जायचे झाल्यास, दोघांनीही मास्क वापरला पाहिजे.
हे करू नका...
एकदा वापरलेला सर्जिकल मास्क पुन्हा वापरू नये. मास्कला वारंवार स्पर्श करणे टाळावे. मास्क व्यवस्थित करावयाचा झाल्यास मास्कच्या पट्ट्यांना हात लावू शकता.
कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हाच एकमेव पर्याय आहे. दुहेरी मास्क वापरल्यास विषाणू नाकातोंडावाटे शिरण्याची शक्यता जवळपास नसतेच. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी दुहेरी मास्क वापरणे हितावह ठरते.
डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.
जिल्ह्यातील एकूण रुग्ण ४१,७०९
बरे झालेले रुग्ण ३५,५२३
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ५,४५५