अकोला : दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला. सुरुवातीला चांगला पाऊस झाला आणि हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. आता पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतित आहेत. मृगाचे वाहन गाढव, तर आर्द्राचे कोल्हा आहे. यंदा मृग नक्षत्रात पावसात खंड पडल्याने आर्द्राचे वाहन कोल्हा तारणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मान्सूनचे आगमन होऊन बरेच दिवस झाले. तरी जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाला नाही. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेले. त्यातच पाऊस आठ दिवस लांबल्याचे चित्र आहे. दिवसा कडक ऊन तर रात्री आकाशात चांदणे दिसत आहे. अचानक पावसाचे वातावरण तयार होते. मात्र, पाऊस पडत नाही. मृग नक्षत्रात जिल्ह्यात पावसाची संततधार अपेक्षित होती; पण पडणारा पाऊसही विखरून पडत आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला. तेथील शेतकरी सुखावतो तर बाकीच्यांना प्रतीक्षा करावी लागते. जिल्ह्यात १०.२१ टक्के क्षेत्रावर यंदा खरिपाचा पेरा झाला आहे. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतित आहे.
पावसाची स्थिती (मिमी)
२५०
अपेक्षित पाऊस
१६५.३
आतापर्यंत झालेला पाऊस
कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)
३,१०,०००
अपेक्षित पेरणी क्षेत्र
४९,३३४
आतापर्यंत झालेली पेरणी
सर्वांत कमी पाऊस
अकोट तालुका ३४.६
सर्वांत जास्त पाऊस
मूर्तिजापूर तालुका १३१.२
तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस
तालुका झालेला पाऊस (मिमी) पेरणी (हेक्टरमध्ये)
अकोट ३४.६ ८,२११
तेल्हारा ५३.७ ७,१६३
बाळापूर ५८.५ १,२६३
पातूर ९०.९ १३,५३०
अकोला ५४.० ४,२८१
बार्शीटाकळी ९४.५ १३,९८४
मूर्तिजापूर १३१.२ ९०२
...तर खते-बियाणे कशी मिळणार?
यंदा चांगला पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मान्सूनही लवकर दाखल झाला. मात्र, पेरणी केल्यानंतर पावसाने पाठ फिरविली.
- किशोर मोरे, शेतकरी
सुरुवातीला काही दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतात कपाशीची पेरणी केली. आता पाऊस नसल्याने पीक कोमेजून जात आहे.
- विजय पाटील, शेतकरी
यावर्षी बियाणे-खतांचे दर वाढले आहे. महागडे बियाणे घेऊन पेरणी केली. मात्र, पावसात खंड पडल्याने यंदाही नुकसान होण्याची शक्यता आहे.
- देवीदास धोत्रे, शेतकरी