बार्शिटाकळी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्ये नगरपंचायतने शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवला; मात्र नेहमीच्या जागी आठवडी बाजार न भरता अकोली बेस या अरुंद ठिकाणी भरला. बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. कोरोना प्रतिबंध करण्याबाबत स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगर परिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रातील आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी आदेश दिला होता. दर शुकवारी बार्शिटाकळी येथील आठवडी बाजार भरतो. नगरपंचायत प्रशासणाने दवंडी देऊन बाजार बंद असल्याचे जाहीर केले. आठवडी बाजार भरू नये, याकरिता पोलीस प्रशासनाच्या मदतीने बाजार बंद ठेवण्यात यशस्वी झाले, परंतु आठवडी बाजार नेहमीच्या ठिकाणी न भरता अकोली बेसच्या अरुंद ठिकाणी चौकात शुक्रवारचा आठवडी बाजार भरला. बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. (फोटो)