निहिदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढीत जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे गुरुवारी आठवडी बाजार भरवण्यात आला. या बाजारात ग्राहक व विक्रेते विनामास्क आढळून आले. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे दिसून आले.
फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला पिंजर येथे केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले. पिंजर येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. कोरोनाचे संकट गडद असतानाही गुरुवार, ११ फेब्रुवारी रोजी बाजार भरला. बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. तसेच ग्राहक व विक्रेते विनामास्क फिरताना दिसून आले. विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
आठवडी बाजार भरविण्याची परवानगी नाही. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे, उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल.
-गजानन हामंद, तहसीलदार, बार्शीटाकळी
-------------------------
कोरोनाच्या संकटात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून साहित्यांची खरेदी करावी, गर्दी करू नये. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बाजार भरविणे योग्य नाही.
- विजय ठाकरे, पिंजर