अकोला : उन्हाळ्यात वाढलेली विजेची मागणी पूर्ण करताना महावितरणला चांगलीच कसरत करावी लागत असून, विजेच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात महावितरणकडून सर्वच फिडरवर गत आठवडाभरापासून भारनियमन केले जात आहे. विविध फिडरवर ठरावीक वेळापत्रकानुसार सव्वातीन तास ते सव्वाआठ तास भारनियमन होत असल्याने, भर उन्हाळ्यात नागरिक विजेविना त्रस्त झाले आहेत.विजेची वाढती मागणी व प्रत्यक्ष पुरवठा यामधील तफावत वाढत असल्याने गत काही दिवसांपासून महावितरणकडून आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. कोयना येथील वीज निर्मिती केंद्रातून होणारा वीज पुरवठा थांबल्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच विजेची मागणी वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ बसत नसल्याने महावितरणकडून भारनियमनाचा पर्याय अवलंबिल्या जात आहे. जिल्ह्यातही गत आठवडाभरापासून विविध ग्रुपवर आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना होणाऱ्या या भारनियमनामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार ई, एफ, जी १, जी २, जी ३ या ग्रुपवर टप्प्या-टप्प्याने भारनियमन करण्यात येत आहे. यामुळे विविध फिडरवरील सव्वातीन ते सव्वाआठ तास खंडित राहत आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढला असताना नागरिकांकडून विजेच्या उपकरणांचा वापर वाढला आहे. गारवा देणारे कुलर, एसी, पंखे आदी उपकरणे बंद राहत असल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेक गावांमध्ये रात्रीच्यावेळीही बत्ती गुल राहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
भारनियमन; नागरिक त्रस्त!
By admin | Published: May 04, 2017 12:50 AM