अकोला : राज्यभरातील औद्योगिक ग्राहकांच्या दारी जाऊन तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक जिल्ह्यात 'स्वागत सेल' सुरु करण्यात येणार आहे. तसे परिपत्रक महावितरणतर्फे जारी करण्यात आले असून येत्या तीन दिवसांत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 'स्वागत सेल' कार्यान्वित होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात किंवा महावितरणच्या मंडलस्तरावर अधीक्षक अभियंता यांच्या अखत्यारित 'स्वागत सेल' कार्यान्वित होईल. या सेलचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता तसेच व्यवस्थापक किंवा उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. नवीन वीजजोडणी, जादा वीजभार या मागणीसह वीजपुरवठा व बिलिंगच्या तक्रारी किंवा प्रश्न मांडण्यासाठी जिल्हानिहाय 'स्वागत सेल' साठी एक समर्पित संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी राहणार आहे. त्याची माहिती औद्योगिक ग्राहक व संघटनांना विविध माध्यमातून कळविण्यात येणार आहे. यासह इतर माध्यमाद्वारे महावितरणकडे प्राप्त झालेली तक्रार किंवा मागणी ही 'स्वागत सेल'कडे पाठविली जाईल व त्याद्वारे कार्यवाहीला विनाविलंब सुरवात होईल.
महावितरण जाईल ग्राहकांच्या दारी
नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभारसंबंधी 'स्वागत सेल'कडे मागणी नोंदविल्यानंतर संबंधित औद्योगिक ग्राहकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, शुल्क आदींची माहिती दिल्या जाईल. दोन कार्यालयीन दिवसांत कागदपत्रांची पुर्तता, ऑनलाइन अर्ज व प्रक्रिया शुल्क भरण्याची कार्यवाही महावितरणकडून ग्राहकांच्या दारी जाऊन केली जाईल. त्यानंतर लगेचच स्थळ पाहणीच्या तांत्रिक अहवालानुसार फर्म कोटेशन देण्यासह नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु होईल. यासोबतच वीजसेवा किंवा बिलिंगच्या प्राप्त तक्रारींचे सेवेच्या कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत किंवा त्यापूर्वीच निराकरण करण्यात येणार आहे.