लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: उन्हाळी सुट्ट्यानंतर मंगळवारी शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजणार असून, मुलांच्या स्वागतासाठी फुलांसह शाळा प्रशासन व लोकप्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहणार असल्याने शाळेचा पहिला दिवस हा आनंदी करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा आहे.जिल्ह्यातील एकूण ९२४ प्राथमिग्क शाळेत एकूण ७१ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंददायी करण्यासाठी शासनाने प्रवेशोत्सव संकल्पना अस्तित्वात आणली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी २७ जून रोजी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मध्यान्ही भोजन देण्यात येणार आहे. भोजनामध्ये विद्यार्थ्यांना एक गोड पदार्थसुद्धा खायला देण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही खासगी संस्थेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच उर्वरित खासगी संस्थेच्या शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा होणार आहे.मुलांचे स्वागत करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले असून, जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळांनासुद्धा सूचना दिल्या आहेत. दीर्घ सुट्ट्यांच्या आनंदानंतर विद्यार्थी शाळेत येतील. त्यांना शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व प्रेरणादायी असल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल. या दृष्टिकोनातून शासनाने दोन वर्षांपासून शालेय प्रवेशोत्सवाचा उपक्रम सुरू केला आहे. प्रवेशोत्सवामध्ये लोकप्रतिनिधींचाही सहभाग शालेय प्रवेशोत्सवाचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामध्ये कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहून मुलांचे स्वागत करणार आहेत.
फुलांनी होणार मुलांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 9:51 AM