अकाेला : ‘लाेकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लाेकमत’ अकाेला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती साेहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी आलेले राज्यपाल रमेश बैस यांचे शनिवार, १० जून रोजी सकाळी अकोला रेल्वेस्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.
राज्यपालपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर रमेश बैस हे प्रथमच अकोल्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पुणे-काजीपेठ एक्स्प्रेसने सकाळी ८.३० वाजता राज्यपालांचे अकोला स्थानकावर आगमण झाले. या ठिकाणी विभागीय आयुक्त निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी जावरे, डॉ. गिरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, युनिट हेड आलोककुमार शर्मा आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांचा ताफा शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाला. शासकीय विश्रामगृह येथे राज्यपालांचे प्रशासनाकडून राजशिष्टाचाराचे पालन करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
‘लाेकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लाेकमत’ अकाेला आवृत्तीचा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा शनिवार, १० जून राेजी आयाेजित करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस या साेहळ्याचे मुख्य अतिथी आहेत. शनिवारी सकाळी ११:०० वाजता रिधाेरा राेडवरील हाॅटेल जलसा येथे हा साेहळा होत असून, साेहळ्याला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार प्रमुख अतिथी आहेत. लाेकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन डाॅ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत, लाेकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेला हा सोहळा आटोपल्यानंतर राज्यपाल हे दुपारी २ वाजता येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भातील विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक आटोपल्यानंतर राज्यपाल सायंकाळी सहा वाजता शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. दर्शन आटोपल्यानंतर शेगाव येथील विसावा विश्रामगृह येथे ते काही काळ विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर रात्री ९ वाजता ते अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेसने मुंबईकडे रवाना होणार आहेत.