- नीलिमा शिंगणे-जगडअकोला - अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुध्दिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संघाने पटकाविले. पुरू ष व महिला दोन्ही गटामध्ये पुणे विद्यापीठाने विजेतेपद पटकावित स्पर्धेत आघाडी कायम राखली. पहिल्या दिवसापासूनच पुणे विद्यापीठाने दोन्ही गटात आपले वर्चस्व सिध्द केले होते. पुरू षांच्या गटात साडे सत्तावीस गुण तर महिला गटात वीस गुण मिळवून पुणे विद्यापीठाने प्रथम स्थान मिळविले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे सोमवारी स्पर्धेचा समारोप झाला.या स्पर्धेत पुरू षगटामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने साडेसत्तावीस गुणांसह प्रथम, मुंबई विद्यापीठाने पंचवीस गुणांसह द्वितीय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ बावीस गुणांसह तृतीय आणि एमआयटी वर्ल्डपीस विद्यापीठ पुणे संघाने चतुर्थस्थान मिळविले. महिलांच्या गटामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाने प्रथम, शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर द्वितीय, मुंबई विद्यापीठ तृतीय आणि डॉ.हरिसिंग गौर विद्यापीठ सागर संघाने चतुर्थस्थान मिळविले.पुरू षांच्या गटात सर्वाधिक ८ गुण एमआयटी वर्ल्डपीस विद्यापीठ पुणे संघाचा देवांशू मिस्त्री, मुंबई विद्यापीठाचा चिराग सत्कार व सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचा निखिल दिक्षित यांनी मिळविले. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचाच रणवीर मोहिते, अखिलेश नागरे यांनी ६ गुण मिळवून सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. महिला गटात संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची नागलक्ष्मी आर. हिने सर्वाधिक ८ गुण मिळविले. तर बडोदा विद्यापीठाची लासनी कोठारी, मुंबई विद्यापीठाची गिरीश्मा अस्सार या दोघींनी साडे सात गुण मिळविले. हरिसिंग विद्यापीठ सागरची प्रतिक्षा पटेल, नांदेड विद्यापीठाची प्रसन्ना तुनगर आणि उदयपुरच्या दिपिका साहु यांनी ५ गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली.पाच दिवसीय या स्पर्धेचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि महाविद्यालयाने केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या पाच राज्यातील सुमारे सहाशेच्या वर बुध्दिबळपटू सहभागी झाले होते. पुरू षांच्या गटात ४८ आणि महिला संघात ४१ विद्यापीठ संघाने सहभाग नोंदविला होता.स्पर्धेचा समारोपस्पर्धा समाप्तीनंतर लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी कल्याण संचालक आर.जी.देशमुख, एसबीआयचे कृष्णकुमार टेकाटे, डॉ. एस.आर दलाल, डॉ. प्रकाश नागरे, डॉ. उमेश राठी, डॉ. खर्चे विराजमान होते. मान्यवरांचे स्वागत डॉ. आर.जी.देशमुख यांनी केले.यावेळी संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक योगेन्द्र पाटिल पुणे, डॉ. विशाल तिवारी अजमेर, राहुल लहाने कोल्हापुर, हितेश चौधरी गुजरात आणि खेळाडू वैष्णवी आखडे यांनी आपल्या मनोगतामध्ये स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याचे सांगितले. डॉ. भाले यांनी आपल्या भाषणात, पुढील वर्षी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. आभार डॉ. मोहन कोटावार यांनी मानले.
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुध्दिबळ स्पर्धा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अजिंक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 9:59 PM