राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यातील पावसाचे चित्र अद्याप अस्पष्ट असून, तीन दिवसांपासून पडणार्या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नसल्याने पश्चिम विदर्भात आतापर्यंत २३३.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या ३२ टक्के कमी असल्याने शेतकर्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने राज्यात दमदार सुरुवात केली; पण लगेच प्रदीर्घ दडी मारल्याने शेतकर्यांनी या पावसाच्या भरवशावर पेरणी केलेली पिके करपली आहे. सव्वा महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर २0 जुलैपासून पावसाचे राज्यात पुनरागमन झाले; पण हा पाऊस सार्वत्रिक स्वरू पाचा नसल्याने मराठवाडा व पश्चिम विदर्भ तहानलेलाच आहे. १ जून ते २३ जुलैपर्यंत पश्चिम विदर्भात केवळ १३ दिवस पाऊस पडला आहे. या १३ दिवसांपैकी ९ दिवस हे जून महिन्यातील पावसाचे आहेत. कृषी विभागाने दिलेल्या महितीनुसार, या दोन महिन्यात (२३ जुलैपर्यंत) वर्हाडातील पाच जिल्हय़ात ३४२.१ मि.मी. पावसाची गरज होती; तथापि प्रत्यक्षात २३३.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच हा पाऊस सरासरीच्या ६८ टक्के एवढाच असून, ३२ टक्के पाऊस कमी आहे. जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी बघितल्यास अकोला जिल्हय़ात आतापर्यंत ३0६.८ मि.मी. पावसाची गरज होती. प्रत्यक्षात २0३.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच हा पाऊस ६६ टक्के असून, सरासरीच्या ३४ टक्के कमी आहे. बुलडाणा जिल्हय़ात २९२.९ मि.मी. पावसाची गरज होती. प्रत्यक्षात १५५.१ मि.मी. पाऊस झाला असून, हा पाऊस केवळ ५३ टक्के आहे. म्हणजे बुलडाणा जिल्हय़ात सरासरीच्या ४८ टक्के पाऊस कमी आहे. वाशिम जिल्हय़ात सरासरी ३५५. ५ मि.मी. पाऊस हवा होता, प्रत्यक्षात १६६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसाची टक्केवारी ७५ असून, सरासरीच्या २५ टक्के पाऊस कमी आहे. अमरावती जिल्हय़ात सरासरी ३५१.१ मि.मी. पावसाची गरज होती; तथापि २६७.२ मि.मी. पाऊस पडला आहे. हा पाऊस ७६ टक्के आहे. यवतमाळ जिल्हय़ात ४0४.४ मि.मी. पाऊस हवा होता. प्रत्यक्षात २७४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ६८ टक्के एवढा आहे.
पश्चिम विदर्भात सरासरीच्या ३२ टक्के पाऊस कमी !
By admin | Published: July 24, 2015 12:59 AM