- अतुल जयस्वाल
अकोला : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेलेल्या भारतातील हजारो विद्यार्थ्यांना रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यामुळे शिक्षण मध्येच सोडून मायदेशी परतावे लागले आहे. यामध्ये अकोल्यातीलही चार विद्यार्थ्यांचा समावेश असून, गत दोन महिन्यांपासून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मदार ऑनलाइनवरच आहे. कधी एकदा युद्ध संपते व कधी युक्रेनला जाऊन शिक्षण पूर्ण करतो, अशी स्थिती शिक्षणापासून दुरावलेल्या या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची झाली आहे.
फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले. युद्धामुळे तो देश तर बेचिराख होतच आहे; परंतु सर्वाधिक फटका तेथे शिक्षण घेत असलेल्या भारतीय व इतर देशातील विद्यार्थ्यांना बसला आहे. अकोल्यातील प्राप्ती भालेराव, मोहित मळेकर, हसनउल्ला खान, जॅक निक्सन हे चार विद्यार्थी युक्रेनच्या विविध विद्यापीठांमध्ये एमबीबीएसची शिक्षण घेत होते. कुणी प्रथम वर्षाला, तर कुणी द्वितीय वर्षाला. सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे काही दिवस अडकून पडल्यानंतर मार्च महिन्यात चारही विद्यार्थी कसेबसे घरी परतले. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सद्या ते प्रवेशित असलेल्या विद्यापीठांकडून ऑनलाइन वर्ग घेतल्या जात आहेत. एप्रिल महिन्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू असल्यामुळे शिक्षणात खंड पडला नसल्याचे विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. लाखो रुपये खर्च करून विदेशात पाठविलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
प्रात्यक्षिकाचे काय?
वर्ग नियमितपणे होत असले व विद्यार्थ्यांच्या थिअरचे काही नुकसान होत नसले तरी ऑनलाइनवर प्रॅक्टिकल कसे करणार, असा प्रश्न आता विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे. ऑनलाइन शिकून डॉक्टर होता येत नाही, असे उद्गार एका विद्यार्थ्याच्या पालकाने काढले.
भारतात कुठेही द्यावे ॲडमिशन
युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती निवळण्याची सद्या तरी शक्यता दिसत नाही. तसेच युरोपच्या इतर देशांमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची परवानगी नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना भारतातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश द्यावा, अशी मागणीचे मोहितचे वडील डॉ. विजय मळेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे.
एप्रिल महिन्यापासून नियमित क्लास होत आहेत. त्यामुळे सद्या तरी शिक्षणाचे नुकसान झालेले नाही. महत्त्वाची पुस्तके व नोट्स सोबत आणल्या आहेत. युद्ध सुरूच असल्याने तिकडे परत जाणे शक्य नाही. युद्ध संपण्याची प्रतीक्षा आहे.
- प्राप्ती भगवान भालेराव, विद्यार्थिनी, तेल्हारा
सोमवार ते शुक्रवार दररोज तीन ते चार क्लास ऑनलाइन होतात. परंतु, ऑनलाइनला मर्यादा असतात. युद्ध संपण्याची चिन्हे नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आम्हाला भारतातील कॉलेजमध्ये प्रवेश द्यावा.
- माेहित मळेकर, विद्यार्थी, अकोला
ऑनलाइन क्लास सुरू असल्यामुळे थिअरीच नुकसान होत नसले, तरी प्रॅक्टिकल होणेही गरजेचे असते. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यापीठ बदलण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
- डॉ. तबिश खान, हसनउल्ला खानचे काका, अकोला