- राजरत्न सिरसाट
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त शेतकºयांसाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याने, कृषी विद्यापीठाने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले. २० ते २२ आॅक्टोबरपर्यंत तीन दिवस शेतकºयांना विविध संशोधन, तंत्रज्ञान बघण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती; पण हे तंत्रज्ञान, संशोधन बघून शेतकºयांना किती फायदा होतो, या अनुषंगाने विचार करणे गरजेचे आहे.बडे उद्योग अद्याप पोहोचले नसल्याने विदर्भातील अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. त्या अनुषंगाने शेतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या क्षेत्रात वेगाने होणारे बदल, नवे तंत्रज्ञान, संशोधनाची भर पडत आहे. तसेच हवामान बदलाचे संकट उभे ठाकले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता, शेतकºयांना देशासह जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी हे सर्व ज्ञान येथील शेतकºयांना अवगत होणे गरजेचे आहे. याचाच सारासार विचार करू न राज्यात कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. विदर्भातील अकोला येथेही विद्यापीठ स्थापन करण्यात आले; पण या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी विदर्भातील शेतकºयांना प्राणांची आहुती द्यावी लागली. या विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर २०१८ रोजी ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. स्थापनेनंतर या कृषी विद्यापीठाने नवे वाण, संशोेधन, तंत्रज्ञान विकसित केले. हे तंत्रज्ञान, संशोधन शेतकºयांनी अवगत करू न शेतावर अवलंब करावा, यासाठी कृषी विद्यापीठाच्या वतीने विदर्भातील शेतकºयांसाठी शेत शिवारफेरीचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी तीन दिवसात १० हजारावर शेतकºयांनी कृषी विद्यापीठाला भेट देऊन माहिती घेतली, प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर पाहणी केली; पण या तंत्रज्ञानाचा अवलंब किती शेतकरी करतात, हे बघणे महत्त्वाचे आहे. शिवारफेरीनंतर याचा आढावा विद्यापीठाकडून घेतला जातो का, हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. शिवारफेरीला येणारे शेतकरी नाव नोंदणी करीत असल्याने ही माहिती कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असतेच. याकडे विद्यापीठाला लक्ष देण्याची गरज आहे.यावर्षी शेतकºयांनी सेंद्रीय शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठीची रुची दाखविली. भेटी देण्यासाठी आलेल्या शेतकºयांनी आवर्जून या ठिकाणी भेट दिली. हे चांगले संकेत असले तरी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांनी अवलंब करावा, यासाठी कृषी विद्यापीठालाच शेतकºयांकडे जावे लागणार आहे. शेतकºयांनी गौण तृणधान्य, भरड धान्यामध्ये नाचणी, भादली, राळा, भगर इत्यादी देशी पारंपरिक पिकांबद्दल माहिती जाणून घेतली. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून, कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिराळ्या पद्धती, गांडूळ खत प्रकल्प, विविध जिवाणू खते, मुख्यत्वे कचºयापासून उपयुक्त कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरात आणणे, कचरा कुजविणारे जिवाणू वापराचे प्रात्यक्षिक शेतकºयांनी जाणून घेतले. याचा प्रसार आता कृषी विद्यापीठाला करावा लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाकडे विस्तार विभाग आहे. कृषी विभागानेदेखील सेंद्रीय शेती विकासासाठी विस्तार कक्षा रुंदावण्याची गरज आहे; पण मनुष्यबळाअभावी हे या संस्थांना शक्य नसल्याने शिवारफेरीचा फायदा शेतकºयांना होतो का, हा प्रश्न निर्माण होत आहे.