अकोला: ढोलताशांचा गजर.. आकाशात भिरभिरणार्या भगव्या पताका.. ह्यतुमचे आमचे नाते काय.. जय जिजाऊ, जय शिवराय!ह्ण चा जयघोष अन् ढोल-ताशे, दिंडी अन् गोंधळ, संबळाच्या तालावर थिरकरणारी, भगवे फेटे परिधान केलेली तरुणाई.. महिला भगिनी.. हे चित्र अवघ्या अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत होते. निमित्त होते, बहुजनांचा राजा, श्रीमंत योगी छत्रपती शिवरायाच्या जन्मदिनाचे. शिवरायांच्या स्वागताला जणू शिवशाहीच अवतरली, अशा थाटात छत्रपतींची शोभायात्रा शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी शहरातून निघाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने जल्लोषात शोभायात्रा काढली. शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ाला मानाचा मुजरा करून शोभायात्रेची सुरुवात झाली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर उज्ज्वला देशमुख यांनी छत्रपती शिवरायांचे पूजन केले. शोभायात्रेमध्ये सजलेले अश्व, गोंधळ, संबळाच्या तालावर नाचणारे गोंधळी, अश्वारूढ रथात विराजमान झालेले प्रतिकात्मक शिवराय, भगव्या पताका खांद्यावर घेऊन ढोलताशांच्या गजरावर बेधुंद होऊन नाचणारे युवक, ढोलताशांवर थाप देऊन गजर करणारे संकल्प प्रतिष्ठानचे युवक हे सर्व लक्षवेधक होते. दिमाखात निघालेल्या छत्रपती शिवराजेंच्या शोभायात्रेतील देखणा सोहळा पाहण्यासाठी अकोलेकर नागरिकांनी रस्त्याच्यावर दुतर्फा मोठी गर्दी केली होती. चौकाचौकांमध्ये शोभायात्रेचे स्वागत करण्यात येत होते. पुष्पांची उधळण करीत, भगवे फेटे परिधान करून शोभायात्रेत सहभागी झालेल्या भगिनी, युवक, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी लक्ष वेधून घेत होते.
तुमचे आमचे नाते काय.. जय जिजाऊ, जय शिवराय!
By admin | Published: February 20, 2016 2:36 AM