- संतोष येलकर
अकोला : विज्ञान शाखेतील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा ‘हॉट्स अॅप ग्रुप’ तयार करून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसंदर्भात सल्ला देण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी होणाऱ्या त्रासापासून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.विज्ञान शाखेच्या इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी अकोला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत गत २४ जुलै रोजी जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा ‘हॉट्स अॅप ग्रुप’ तयार करण्यात आला. या ‘हॉट्स अॅप ग्रुप’द्वारे विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसाठी महाविद्यालय स्तरावर तयार करावयाची प्रकरणे, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र यासंबंधीची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत प्राचार्यांना दिली जाते. विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तयार झाल्यानंतर, महाविद्यालयातील संबंधित कर्मचारी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कर्मचाºयांकडून महाविद्यालयातच विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रस्तावांची छाननी करण्यात येते. प्रस्तावांच्या छाननीनंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत गत जुलैपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालय स्तरावरच जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारून प्रस्तावांची छाननी करण्यात येत असल्याने, जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडताळणी समिती कार्यालयात विद्यार्थ्यांची होणारी गर्दी थांबली असून, रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.कायदा, नियमांचीही दिली जाते माहिती!जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत जिल्ह्यातील प्राचार्यांच्या हॉट्स अॅप ग्रुपवर जात वैधतासंदर्भात कायदा, शासनाचे नियम व इतर प्रकारची महत्त्वपूर्ण संबंधित माहितीदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसाठी महाविद्यालय स्तरावर प्रस्ताव स्वीकारणे, छाननी प्रक्रिया तसेच जात वैधतासंदर्भात कायदा, शासनाचे नियम व इतर माहिती ‘हॉट्स अॅप ग्रुप’द्वारे जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिली जात आहे.-एस.आर. कदमउपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती