यंदा अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांची उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांची झीज भरून काढण्यासाठी तालुक्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकांची पेरणी केली. सद्य:स्थितीत ही पिके बहरली असून, फूलधारणा अवस्थेत आहेत; मात्र ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या दाट धुक्यामुळे फूलगळती होत आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. (फोटो)
भुईमूग पिकाला सिंचनाची चिंता!
बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीची उलंगवाडी करीत पीक नष्ट केले. सिंचनाची सुविधा असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करणे सुुरू केले आहे. बार्शीटाकळी तालुक्यात अंदाजे २५ ते ३० वर्षांनंतर भुईमुगाचे सर्वाधिक क्षेत्र या वर्षी असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. ऐन शेंग धारणेच्या अवस्थेत पाण्याची गरज असताना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध राहणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.