अकोला : उन्हाची तीव्रता जाणवू लागलेल्या मार्च महिन्यात गहू काढणीला वेग येत आहे. रब्बीत गहू पिकाची सरासरी आठ लाख ७५ हजार ६३३ हेक्टर क्षेत्रात लागवड अपेक्षित होती. मात्र, यावर्षी विक्रमी १३ लाख सहा हजार २३५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली. आता हे पीक काढणीला असून, बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात गहू आला आहे. पुरेसे सिंचन व निसर्गाची साथ लाभल्याने पीक जोरदार व उत्पादनही जोमदार झाले आहे. त्यामुळे राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
अवकाळीची वक्रदृष्टी पडल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. वेळोवेळी बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकरी रब्बी हंगाम लवकर संपविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हरभरानंतर आता त्याची गहू काढणीसाठी लगबग सुरू आहे. राज्यातील काही भागात गहू काढणी सुरू झाली असून उशिरा पेरणी झालेला गहू काढणे बाकी आहे. यावर्षी सरासरी पाऊस झाल्याने सिंचनासाठी भरपूर पाणी उपलब्ध होते. या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांचे गहू पीक चांगले झाले. या पिकाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. तसे झाल्यास खरिपाच्या तयारीसाठी आर्थिक तडजोड शक्य होईल. त्यातच पंजाब, हरियाणा या ठिकाणच्या हार्वेस्टर मशीन मोठ्या प्रमाणात आल्याने स्थानिक मशीनवाल्यांपुढे अडचणी निर्माण होत आहे.
हार्वेस्टरने काढणीला प्राधान्य
हार्वेस्टर मशीनव्दारे एक एकर गहू काढणीसाठी १५०० ते १८०० रुपये घेतले जातात. अर्ध्या तासातच गहू काढून मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व कष्ट वाया जात नाही. त्यामुळे शेतकरी यंत्राच्या साहाय्याने गहू काढणीला प्राधान्य देत आहे.