अकोला : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात रविवारी जिल्ह्यातील बार्शीटाकळी आणि पातूर या दोन तालुक्यांत २६ गावांमध्ये ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला.जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत रविवार, १ मार्च रोजी रात्री वादळी वाºयासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. अवकाळी पावसाच्या तडाख्यात रब्बी हंगामातील गहू, काढणीला आलेला हरभरा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला व कापणीला आलेल्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला. जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर तालुक्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांमार्फत सोमवार, २ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील २६ गावांत ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे.त्यानुसार जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर या दोन तालुक्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल २ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला.
पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश!अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर या दोन तालुक्यात २६ गावांमध्ये गहू पिकाचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, दोन्ही तालुक्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.