अकोला : खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांजवळ शेतमाल शिल्लक नसल्याने बाजार समितीतही आवक घटली आहे. शनिवारी बाजार समितीत केवळ ६१ क्विंटल गव्हाची आवक झाली. गव्हाला जास्तीत जास्त १९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
बीबीएफनुसार पेरणीकडे कल
अकोला : पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे ; परंतु यंदा बीबीएफनुसार पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. जिल्ह्यात कृषी विभागाकडून याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे.
शनिवारी पावसाची हजेरी
अकोला : यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात पावसाचा जोर दिसून आला नाही. दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरात शनिवारी रात्री ८ वाजता पावसाच्या सरी कोसळल्या. अकोला तालुक्यात आतापर्यंत ४३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कांद्याला ६०० ते १६०० रुपयांपर्यंत दर
अकोला : येथील बाजार पेठेत कांद्याला ६०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर दुय्यम दर्जाच्या कांद्याला १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. बाजारात कांद्याला २० ते २२ क्विंटलपर्यंत आवक होत आहे.
सॅनिटायझेशन बंद
अकोला : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाच्या नियमांचा विसर पडला आहे. काही कार्यालयातील सॅनिटायझेशन मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा धोका निर्माण झाला आहे.
पाणी पुरीच्या गाडीवर गर्दी
अकोला : निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरातील विविध रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या पाणी पुरी, नाश्त्याच्या गाड्यांवरही वर्दळ दिसून येत आहे ; मात्र यावेळी नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून येते.
खाली जागांमध्ये साचताहेत डबके
अकोला : शहरातील विविध भागांमध्ये वस्त्यांमध्ये खाली जागा आहेत. या जागेत पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.