अकोला: केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील गोदामात भारतीय खाद्य निगमकडून खराब गव्हाचा पुरवठा झाल्याने त्या खराब गव्हाच्या वजनाची भरपाई करण्याच्या नादात जिल्हाधिकाऱ्यांना द्याव्या लागणाºया गव्हाच्या ‘मापात पाप’ करण्याचा खटाटोप वखारच्या व्यवस्थापनाने केला. पुरवठा विभागाच्या वाहतूक प्रतिनिधीने केलेल्या मोजणीत प्रति दहा क्विंटलमागे ७० ते ८० किलो गहू कमी असल्याचे उघड झाले. या प्रकरणाची तत्काळ दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी वजन मापे निरीक्षकांना शुक्रवारी पत्र देत गोदामातील वजनमापे यंत्रांचा तपासणी अहवाल मागवला आहे.‘एफसीआय’ने अकोल्यातील सीडब्ल्यूसीच्या गोदामात फेब्रुवारी २०१९ पासून गव्हाचा साठा करणे सुरू केले. मध्य प्रदेशातील एफसीआयच्या होशंगाबाद येथील साठ्यातून गव्हाचा पुरवठा करण्यात आला. तो गहू पाण्याने भिजलेला, खापरा कीडग्रस्त, १७ टक्क्यांपेक्षाही अधिक आर्द्रतेचा असल्याची तक्रार वरिष्ठ गोदाम व्यवस्थापकांनी सीडब्ल्यूसी, एफसीआयच्या नागपूर, मुंबई, भोपाळ येथील वरिष्ठांकडे केली. त्या पत्रानुसार एफसीआयच्या मुंबई कार्यालयाने १५ मार्च रोजी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पी.के. बिहारी यांच्यासह नागपूर विभागातील अधिकाºयांकडून तपासणी केली. त्या अधिकाºयांच्या अहवालानुसार वखारच्या गोदामातील गहू केंद्राच्या निकषानुसार एफएक्यू दर्जाचा असल्याचे पत्र एफसीआयचे नागपूरचे प्रादेशिक व्यवस्थापक ए. के. लाल यांनी १८ मार्च रोजी दिले. गोदामातून गव्हाची उचल झाल्यानंतर त्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांची असेल, असेही बजावले. उचल केल्यानंतर तालुक्यातील गोदामांमध्ये पोहोचलेला गहू भिजलेला, कीडग्रस्त तसेच दुर्गंधी येणारा असल्याच्या तक्रारी गोदामपालांसह दुकानदारांनीही केल्या. त्यानंतर वखार महामंडळ, भारतीय खाद्य निगमने नमते घेत खराब गहू परत घेण्याची तयारी दर्शवली. जिल्हाधिकाºयांनी गव्हाची उचल सुरू केली. २ एप्रिलपासून वखार महामंडळाकडून वाहनांमध्ये भरलेल्या गव्हाचे वजन कमी असल्याचे वाहतूक प्रतिनिधींच्या लक्षात आले. त्याबाबत वखारच्या क्रमांक १ च्या गोदाम व्यवस्थापकांना तक्रारही देण्यात आली.- सतत २४ दिवस मारली वजनात दांडीतक्रारीनुसार २५ एप्रिल रोजी गोदाम क्रमांक १ मध्ये धान्याची गोदाम व्यवस्थापकासमक्ष शंभर टक्के मोजणी करण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक वाहनात ८० किलो धान्य कमी आढळून आले. तर ४५० बॅगच्या वाहनात १०५ किलो धान्य कमी आढळले. हा प्रकार २ ते २५ एप्रिलदरम्यान घडला. तर गोदाम क्रमांक २ मध्ये २६ एप्रिल रोजी मोजणी केली असता १०० किलो धान्य कमी आढळले, या दोन्ही गोदामातील मोजणीचा अहवाल वाहतूक प्रतिनिधींनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांना सादर केला.- खराब गव्हाची भरपाई करण्यासाठी पापभारतीय खाद्य निगमने वखारच्या गोदामात साठा केलेल्या ७० हजार पोत्यांमध्ये किमान ५ हजार पोत्यांतील गहू खराब असल्याची माहिती आहे. त्या गव्हाचा भुर्दंड एफसीआय, सीडब्ल्यूसीला पडणार आहे. त्यातून वाचण्यासाठी जिल्हाधिकाºयांनाच वजनात गहू कमी देऊन कारवाईचा फास पुरवठा विभागाच्या गळ््यात टाकण्याचा प्रतापही वखारच्या गोदाम व्यवस्थापनाने केला आहे.