सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एस.टी.कामगार संघटनेने मंगळवारी पुकारलेल्या संपामुळे सणासुदीत प्रवाशांचे हाल झालेत. सर्व आगारात शेकडो बसगाड्या अडकून पडल्याने एका दिवसात अकोल्यात बारा लाखांचे नुकसान झाले. संपाचा गैरफायदा घेत, दिवाळीच्या निमित्ताने गावाकडे निघालेल्या प्रवाशांची खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मंगळवारी अक्षरश:लूट केली.
अकोला : विभागात ९ आगारातून ४१६ गाड्या दररोज प्रवाशांची वाहतूक करतात. तब्बल १ लाख ३0 हजार प्रवाशी एसटीच्या सेवेचा लाभ घेतात. आज ही सेवा ठप्प झाल्याने ४0 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मूर्तिजापूर : ग्रामीण क्षेत्रातील प्रवाशांना खासगी वाहनाने घर गाठण्याकरिता दुप्पट तिकीट द्यावे लागले. संपामुळे दररोज विविध ठिकाणांवरून येणार्या-जाणार्या २00 पेक्षा अधिक बसफेर्या रद्द झाल्या.
तेल्हारा : तेल्हारा आगार व्यवस्थापक, लिपिक असे तीन कर्मचारी वगळता आगारातील ८३ चालक, ८८ वाहक, ३0 मेकॅनिक, सहा वाहतूक नियंत्रक, आठ लिपिक, दोन पर्यवेक्षक असे २१७ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
पातूर: पातूर बसस्थानकावर दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंंत जा-ये करणार्या लांब पल्ल्याच्या ७५ जलद, ७५ साधारण बसफेर्या तथा पातूर बसस्थानकाच्या पाच बसफेर्या संपूर्णत: रद्द झाल्या आहेत.
बाळापूर : बाळापूरात खासगी वाहनधारकांनी बाळापूर-पातूरचे प्रवास भाडे भरमसाट वाढवून ते दुप्पट केले.