लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही मालमत्ताधारकांना ‘टीडीआर’चे वाटप का झाले नाही, ज्या मालमत्ताधारकांना आर्थिक मोबदला हवा आहे, त्यांच्यासाठी काय तरतूद केली, असे आ. बाजोरिया यांनी नानाविध प्रश्न उपस्थित केले असता, मनपाचे अधिकारी उत्तर देऊ शक ले नाहीत. निकषानुसार रस्त्याचे निर्माण झाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली. मनपा प्रशासनाने जमीन अधिग्रहणाचे सर्व निकष, नियम धाब्यावर बसवत गोरक्षण रोडवर निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी रस्त्यालगतच्या इमारतींना हटवले. भविष्यात या ठिकाणी निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी ध्यानात घेता रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य करीत जागा दिली. या बदल्यात मालमत्ताधारकांना ‘टीडीआर’ देणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. प्रशासनाने आजपर्यंत ना ‘टीडीआर’ दिला ना आर्थिक मोबदला. मनपाला ‘टीडीआर’चा विसर पडला का, तो नेमका कधी देणार, असा सवाल उपस्थित करीत शिवसेना आमदार बाजोरिया यांनी शनिवारी मनपाच्या प्रशासकीय अधिकाºयांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची चांगलीच कानउघाडणी केली.शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या ५०० मीटर अंतरावर ‘बॉटल नेक’ (निमुळता भाग) तयार होणार असल्याचे निदर्शनास आले. मनपा प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाºया इमारतींना हटविण्याचा निर्णय घेतला. ‘डीपी प्लॅन’नुसार गोरक्षण रोड एकाच बाजूने नऊ मीटर रुंद होता. हा रस्ता रुंद न झाल्यास भविष्यात या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, गोरक्षण रोडवरील रहिवाशांनी रस्ता रुंदीकरणासाठी सकारात्मक भूमिका घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी साडेचार मीटर जागेचा मनपाला ताबा दिला. शहराचा विचार करून स्थानिक मालमत्ताधारकांनी प्रशासनाला सहकार्य केले. जागेच्या बदल्यात प्रशासनाने ‘टीडीआर’ (हस्तांतरणीय विकास कायदा) देणार असल्याचे स्पष्ट केले होते. जागा ताब्यात घेऊन चार महिन्यांचा कालावधी होत असला, तरी अद्यापही प्रशासनाने ना ‘टीडीआर’ दिला ना आर्थिक मोबदला. या प्रकाराची दखल घेत आ. गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी इन्कम टॅक्स चौकात जाऊन पाहणी केली. यावेळी मनपाचे नगररचनाकार विजय इखार, ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, राजेश टापरे, युवासेना जिल्हा अधिकारी विठ्ठल सरप, बांधकाम व्यावसायिक दिलीप चौधरी, सुनील इन्नानी यांच्यासह मालमत्ताधारक उपस्थित होते.
...तर रोख रक्कम द्या! गोरक्षण रोडवरील जमिनीचे नियमबाह्यपणे अधिग्रहण करण्यात आले. यापैकी काही भूखंडधारकांना ‘टीडीआर’ची गरज नसेल, तर त्यांना भूसंपादन कायद्याच्या निकषानुसार रोख स्वरूपाचा मोबदला देणे क्रमप्राप्त ठरते. मनपा प्रशासनाने भेदभाव न करता तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश आ. बाजोरिया यांनी दिले.