अकाेला : पैशाच्या पावसाचा माेह, पुत्रप्राप्तीची अभिलाषा, तर कुठे वशीकरणाचे मनसुबे या प्रकारामुळे अंधश्रद्धेचा खेळ करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या खेळातूनच अनेकदा आर्थिक, शारीरिक व मानसिक शाेषण झाल्याचे प्रकारही समाेर आले आहेत. गुन्हेही दाखल झाले. मात्र, तरीही कायद्याची भीती निर्माण करण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अंधश्रद्धेचे भूत कायमच आहे. भूत, भानामती, वशीकरण असला कुठलाही प्रकार नसताे हे विज्ञानाच्या कसाेटीवर सिद्ध झाले आहे, त्यामुळे कुठे असा प्रकार हाेत असेल तर पाेलिसांत तक्रार करण्याचा मार्ग माेकळा असून, त्याकरिता अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची निर्मितीही करण्यात आली आहे.
२०१३ मध्ये झाला कायदा
‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा २०१३’, म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा राज्यात २६ ऑगस्ट २०१३ पासून अमलात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील हे एकमेव राज्य आहे. या कायद्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सातत्याने जनजागृती केली. मात्र, यंत्रणांची उदासीनता अन् श्रद्धा, अंधश्रद्धेचा पगडा यामुळे या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे हाेऊ शकली नाही.
भानामती नाहीच
निव्वळ धूळफेक
भूत, भानामती, बुवाबाजी, जादूटोणा, मंत्रतंत्र, श्रद्धा प्रक्रिया, फलज्योतिष, चमत्कार असे प्रकार नाहीतच. यामधील कुठलाही प्रकार विज्ञानाच्या कसाेटीवर सिद्ध हाेत नाही. केवळ मानवी मनातील भीती आणखी दृढ करून आपले ईप्सित साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक हातचलाखी केली जाते. त्याचा भंडाफाेड अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी अनेकदा केला आहे.
म्हणे पैशाचा पाऊस पाडताे
पैशाचा पाऊस पाडणे हा प्रकार अनेकदा उघड झाला आहे. यामध्ये केवळ आर्थिक फसवणूक व शारीरिक शाेषणासाठीच असे आमिष दाखविल्याचे समाेर आले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा लागू झाला आहे. त्याअंतर्गत अनेक गुन्हेही राज्यभर दाखल झाले आहेत. त्यामुळे भानामती, पैशाचा पाऊस असे प्रकार कुठे हाेत असतील तर पाेलिसांकडे तक्रार केली पाहिजे.
डाॅ. स्वप्ना लांडे, विभागीय महिला संघटक अ.भा. अंनिस