संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा रविवारपासून सुरू करण्यात आला; मात्र या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान पासून खांबोरापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या योजनेचे काम पूर्ण झाले असते तर, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नसती. त्यानुषंगाने तहान लागल्यावर पाणीपुरवठा करण्याची प्रशासनाकडून होणारी धावपळ केव्हा थांबणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण होत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खांबोराजवळील उन्नई बंधार्यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्ग त ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस् थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने, पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी ७ सप्टेंबर रोजी दिला. त्यानुसार १0 सप्टेंबरपासून, टप्प्याटप्प्याने गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. वर्षभरापूर्वीदेखील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. या पृष्ठभूमीवर या गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्याकरिता काटेपूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने होणारा पाण्याचा अपव्यय थांबवून महानपासून खांबोराजवळील उन्नई बंधार्यापर्यंत जलवाहिनी टाकणे आणि त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २२ कोटी रुपयांच्या योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे; परंतु, जलवाहिनी टाकण्याच्या योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने, ६0 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त ६४ गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी महानपासून खांबोरापर्यंत जलवाहिनी टाकण्याची योजना केव्हा मार्गी लागणार आणि या गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामस्थांची तहान भागविण्याकरिता टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून होणारी नेहमीची धावपळ केव्हा थांबणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केलेली अशी आहेत गावे!आपातापा, खोबरखेड, जलालाबाद, मजलापूर, आख तवाडा, गोणापूर, शामाबाद, सुलतान अजमपूर, आपोती खुर्द, आपोती बु., कौलखेड गोमासे, मारोडी, दापुरा, अंबिकापूर, अनकवाडी, घुसर, घुसरवाडी, कासली बु., कासली खुर्द, लाखोंडा बु., लाखोंडा खुर्द, म्हातोडी, नव थळ, खेकडी, परितवाडा, आगर, वल्लभनगर, हिंगणा तामसवाडी, वैराट, गांधीग्राम, निराट, गोपालखेड, राजापूर, धामणा, गोत्रा, पाळोदी, सांगवी खुर्द, सांगवी बु., फरमादाबाद, निंभोरा, कंचनपूर, अलियाबाद, बादलापूर, सांगळूद बु., सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, धोतर्डी, दहीगाव, बहिरखेड, रामगाव, गोंदापूर, पळसो बु., बहादर पूर, कौलखेड जहागीर, बोरगाव मंजू, निपाणा, सुकळी व कानशिवणी.
महान-खांबोरा जलवाहिनीची योजना निविदा प्रक्रियेत!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला महान येथील काटे पूर्णा धरणातून काटेपूर्णा नदीपात्राऐवजी जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्यासाठी महान ते खांबोराजवळील उन्नई बंधार्यापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी २२ कोटींच्या योजनेला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने या योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होणे अद्याप बाकी आहे.
देवरी फाटा, अकोटमधून ६१ गावांना टँकरद्वारे पाणी!पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या अकोट येथील जमिनीखालील टाकीतून (सम्प) आणि देवरी फाटा येथील जमिनीखालील टाकीतून (सम्प) पाणी टँकरद्वारे आणण्यात येत आहे. ४५ पैकी १२ टँकरद्वारे सोमवारपर्यंत गावांना पाणी पुरवठा करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे.