संतोष येलकर / अकोला: अकोला शहरातील जिल्हा परिषद मालकीच्या मिनी मार्केटमधील दुकाने आणि जिल्हयातील इतर मालमत्तांचे ‘स्ट्रक्चर ऑडिट’ अद्यापही मार्गी लागले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या संबंधित मालमत्तांचे स्ट्रक्चर ऑडिट होणार तरी कधी? असा सवाल जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केला. यासोबतच अतिरिक्त शिक्षकांचे ग्रामीण भागातील शाळांमध्ये रिक्त पदांवर समायोजन करण्याची मागणीही सदस्यांनी सभेत रेटून धरली.
अकोला शहरातील सिव्हिल लाइनस्थित जिल्हा परिषद मिनी मार्केटमधील दुकानांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद मालकीच्या मालमत्तांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले; त्याचे काय झाले, अशी विचारणा सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी सभेत केली. जिल्हा परिषद मिनी मार्केटमधील काही दुकानांच्या भाडेकरुंनी पोटभाडेकरूदेखील ठेवल्याचा मुद्दा सदस्य गजानन पुंडकर यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या उत्तरात स्ट्रक्चर ऑडिटची कार्यवाही अद्याप सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाल्याने, जिल्हा परिषद मालकीच्या दुकानांसह जिल्ह्यातील मालमत्तांचे स्ट्रक्चर ऑडिट करणार तरी कधी, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. त्यानुषंगाने स्ट्रक्चर ऑडिटची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी बांधकाम विभागाला दिले. शहरात आणि शहराजवळच्या शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त असून, ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे ग्रामीण भागातील शाळांमध्ये रिक्त पदांवर समायोजन करण्याची मागणी जिल्हा परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाचे गटनेता गोपाल दातकर यांनी सभेत केली.
अशीच मागणी सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ यांनीदेखील रेटून धरली. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाइक, कृषी सभापती योगीता रोकडे, महिला बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. ठमके, सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल दातकर, डाॅ. प्रशांत अढाऊ, चंद्रशेखर चिंचोळकर, गजानन पुंडकर, मीना बावणे, रायसिंग राठोड, प्रकाश आतकड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.