अकोला : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजचे काय झाले, असा सवाल करीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन केले.मोदी सरकारने कोरोना संकटकाळात, २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर करून आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती; परंतु हे पॅकेज प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचले की नाही, याची सत्यता काय आहे? या पॅकेजच्या घोषणेतून शेतकरी, छोटे व्यापारी, उद्योजक, कामगार, नोकरदार यांची प्रचंड फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून ‘कहा गये वो २० लाख करोड’ हे आंदोलन राज्यभरात १० ते १४ आॅगस्टदरम्यान करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात अकोला येथील आळशी संकुलस्थित भाजपाच्या जिल्हा कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत भाजपा लोकप्रतिनिधींना २० लाख कोटीचे पॅकेजबाबत सवाल केला. यावेळी ‘जवाब दो जवाब दो, भाजप नेता जवाब दो’, ‘ कहा गये वो २० लाख करोड’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.