मूर्तिजापूर: वंचित बहुजन आघाडी ही विरोधकांचे मतविभाजन करण्यासाठी स्थापन झाली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर हे लाखो रुपये खर्च करून सभा घेतात. हेलिकॉप्टरमधून फिरतात. त्यासाठी यांच्याकडे एवढा पैसा येतो कोठून, त्यांना कोण आर्थिक रसद पुरवित आहे, असा खोचक सवाल उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अॅड. आंबेडकरांना टोला लगावला.
लोकसभा मतदारसंघाचे काँग्रसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापुरात रविवारी सायंकाळी आयोजित सभेत ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे विरोधकांचे मतविभाजन करण्यासाठी निवडणुकीत उतरले आहेत. यातून अप्रत्यक्षरीत्या कोणाला मदत होत आहे, हे जनतेने ओळखावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करून मते मागण्यासाठी केला जात आहे. असे सांगत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवरसुद्धा हल्ला चढविला. भाजप सरकारने सातबारा कोरा करण्याचे आमिष दाखवित शेतकऱ्यांना झुलवत ठेवले. त्यामुळेच भाजपची तीन राज्यांमधून सत्ता हद्दपार झाली. पंतप्रधान मोदींनी केवळ जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले; परंतु त्यांच्या कार्यकाळात जनतेला महागाई, जीएसटी, नोटाबंदीसारख्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. देशासमोरील समस्या वाढू नयेत, यासाठी जनतेने मोदींना सत्तेतून खाली खेचावे, असे सांगत, त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १६० चा आकडासुद्धा पार करणे कठीण जाईल, असे भाकीतही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभेत बोलताना वर्तविले. काँग्रेस सत्तेत आली तर पाच कोटी कुटुंबांना वर्षाचे ७२ हजार रुपये आणि ३४ लाख नोकºया देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मंचावर उमेदवार हिदायत पटेल, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, माजी आमदार भैयासाहेब तिडके, माजी आ. प्रा. तुकाराम बिडकर, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, डॉ. संतोष कोरपे, विजय कौसल, संग्राम गावंडे, डॉ. शैलेश देशमुख व बबन डाबेराव यांची उपस्थिती होती. संचालन विष्णू लोडम यांनी केले.