अकोटः आयुर्वेदिक औषधामध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीचा पुरवठा अजूनही मोठ्या प्रमाणात जंगलातूनच होतो. ज्याप्रमाणात आयुर्वेदिक औषधींचा वापर वाढत आहे. त्याप्रमाणात वन औषधींची मागणी वाढली आहे. कोरोनाकाळात गुळवेलची मागणी वाढल्याचे दिसून आले. तसेच सद्यस्थितीत सफेदमुसळीला सुगीचे दिवस आले असून, तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डी परिसरात शेतकऱ्यांचा कल वाढल्याने सफेद मुसळीचा पेरा वाढला आहे. बाजारात सफेदमुसळीला एक हजार ते पंधराशे रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळत आहे.
कोरोनाच्या संकट काळात आयुर्वेदिक वनऔषधींना महत्त्व आले आहे. जंगल परिसरात सफेदमुसळी, सप्तरंगी, खंडुचक्का, सीताअशोक अशी वनस्पती आता दुर्मिळ होत चालली आहेत. डोंगरवाटामधून मिळणारा हा निसर्गाचा ठेवा जपून ठेवायचा असेल, तर त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. औषधी जर मिळवायच्या असतील, तर त्याचे शेतामध्ये, बांधावर, उद्यानात, देवराईत, रस्त्याच्या कडेला लागवड करणे आवश्यक आहे. वनौषधी शेतीवर कुठलीही माहिती नसताना शेतीचा अभ्यास करुन शून्यातला शेतकरी कुठपर्यंत मजल मारु शकतो, हे अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डी येथील जगन्नाथ धर्मे या शेतकऱ्याच्या यशोगाथेवरुन समजते. १९८३ मध्ये औषधी वनस्पतीची प्रायोगिक लागवड व अभ्यासाला सुरुवात करुन १९९२ पासून त्यांनी सफेदमुसळीच्या व्यापारीतत्त्वाच्या लागवडीस सुरुवात केली. १९९४ मध्ये शेतकऱ्यांसाठी औषधीवनस्पती व तेले उत्पादक औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना करुन १९९७ मध्ये सफेदमुसळीची शेती व खुली वाहतूक आणि विक्री करण्याचा न्यायालयीन आदेश संघर्ष करून मिळवला. रानात असलेली वनौषधी आता संपूर्ण देशात चार हजार एकरावर पोहोचली आहे. सद्यस्थितीत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डी, रामापूर, धारुर, लाडेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरागत शेतीसोबतच वनौषधीची शेती करणे सुरू केली असून, ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत बेडपद्धतीने तयार करुन त्यावर सफेदमुसळी लागवड केली आहे. सफेदमुसळीला आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली वाढत्या मागणीमुळे सफेदमुसळीला १००० ते १२०० रुपये प्रतिकिलोचा भाव आहे. तसेच कृषीविभागामार्फत अनुदान असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
........................
बियाणे विकत घेऊन सफेदमुसळीची बेडपद्धतीने लागवड केली. वनौषधी असल्याने चांगला भाव मिळून इतर पिकांमध्ये झालेला तोटा भरून निघत आहे. कृषीविभागामार्फत दिले जाणारे अनुदान नियमित मिळत नाही. त्यामुळे याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना अनुदान नियमित द्यावे.
-पंकज आतकड, शेतकरी.
-----------------------------------
मी मागील दहा वर्षांपासून मुसळीची शेती करतो. इतर पिकांपेक्षा मुसळीला भाव जास्त असल्याने शेती फायद्याची ठरत आहे.
-सुनील लाहोरे, मुसळी, उत्पादक शेतकरी.
------------------------------
सफेदमुसळीची आयुर्वेद व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी पाहता आताचे भाव १००० रुपये ते १२०० रुपये प्रतिकिलो आहेत. मागणीच्या प्रमाणात उत्पादन नसल्याने भावात आणखी तेजी येऊ शकते.
-कैलास राऊत, सफेदमुसळीचे व्यापारी
--------------------------------------