नासीर शेख
खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातूर तालुक्यातील वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीचा बुरूज (गढी) गेल्या काही महिन्यांपासून जीर्ण झाल्याने कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बुरूज परिसरात राहणाऱ्या दहा ते पंधरा कुटुंबांचा जीव धोक्यात आहे. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
अकोला-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाहळा बु. येथे पांढऱ्या मातीच्या चार बुरूज (गढी) होत्या. त्यापैकी गेल्या काही वर्षांपूर्वी तीन बुरूज (गढी) कोसळल्या होत्या. त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या एक बुरूज कायम आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जीर्ण अवस्थेत आहे. बुरुजाच्या जवळ जवळपास १० ते १५ घरे आहे; परंतु १० घरे अगदी बुरूजच्या जवळ असल्याने बुरूज कोसळल्यास दहा कुटुंबांतील सदस्यांची जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. बुरूज काढण्याबाबत ग्रामस्थांनी संबंधिताकडे वारंवार तक्रारी केल्या; परंतु संबंधितांकडून तक्रारीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. बुरूज कोसळून जीवितहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न व संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन मातीचा बुरूज (गढी) काढण्यात यावे अन्यथा मोठी घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----------------------------
बुरूज (गढी) जीर्ण झाल्याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील भूमिका घेऊन बुरूज काढण्याची कारवाई करण्यात येईल.
-एन. एस. इंगळे, सचिव, वाहळा बु.
--------------------
गेल्या काही दिवसांपूर्वी निराधार कुटुंबाला मदत पोहोचविण्यासाठी वाहळा बु. येथे गेलो असता, ग्रामस्थांनी बुरूज (गढी) ची पाहणी करण्याची विनंती केली; परंतु सदर प्रकार महसूल संबंधित नाही, तरीही संबंधित सचिवांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सदर विषय निदर्शनास आणून दिला आहे.
- सय्यद ऐहसानोद्दीन, नायब तहसीलदार, पातूर
--------------------
गावात चार बुरूज (गढी) होत्या. काही वर्षांपूर्वी तीन कोसळल्या होत्या. त्यामध्ये जनावरांचे प्राण गेले होते. त्यातून एक बुरूज (गढी) कायम आहे; परंतु जीर्ण झाल्याने कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
-संतोष पाटील, ग्रामस्थ, वाहळा बु.